… तर लातूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही, भाजपा नेत्याचा मंत्री अमित देशमुखांवर निशाणा

लातुर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप नेते आणि माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. लातूरमधील रेल्वे बोगी कारखान्यावरून त्यांनी अमित देशमुख यांच्यावर हा निशाणा साधला आहे. यावेळी रेल्वे बोगी कारखान्याला पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पा करिता विशेष बाब म्हणून दोनशे कोटींचा निधी दिला होता.याची निविदा प्रक्रिया देखील पार पडली आहे.मात्र अजूनपर्यंत याच काम सुरु झालेलं नाही. त्यामुळं हजारो तरूणांच्या हाताला काम देणाऱ्या रेल्वे बोगी प्रकल्पाला पाणी कमी पडले आणि तो लातूरातून गेला, तर जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही,अशी कडक टीका निलंगेकर यांनी केली आहे.

लातूरमध्ये आणि मराठवाड्यामध्ये या कारखान्यामुळं मोठा विकास होणार आहे. हजारो तरुणांच्या हाताला कामदेखील मिळणार आहे. या कारखान्याच्या कामासाठी पाणी कमी पडू नये म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पा करिता विशेष बाब म्हणून दोनशे कोटींचा निधी दिला होता. परंतु राज्यात सरकार बदल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळालेली नाही. त्यामुळं हा प्रकल्प बंद पडतो कि काय अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे. महापालिकेत देखील आता कॉग्रेसची सत्ता असून भाजपची सत्ता असताना केंद्र सरकारने हा प्रकल्प लातूरमध्ये आणला होता.

दरम्यान, एसटीपी प्रकल्प रखडल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत संभाजी पाटील निलंगेकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे जर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुर्ण झाला नााही आणि मराठवाड्यातील रेल्वे बोगी निर्मीतीचा हा मोठा आणि महत्वाचा प्रकल्प जर इतर ठिकाणी गेला, तर लातूरची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, अशा कडक शब्दांत टीका केली आहे.