रेशन दुकानदार मोफत धान्य देत नाही ? तर मग ‘या’ टोल फ्री नंबरवर करा तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सरकारने लॉकडाऊन आणि अनलॉक अशी प्रक्रिया राबविली होती. मात्र, सर्वच एकदम बंद केल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. यावर उपाय म्हणून सरकारने याच काळात मोफत धान्य देण्याची घोषणा केली. परंतु, बर्‍याच ठिकाणी रेशन दुकानदार मोफत धान्य देण्यास टाळाटाळ करत आहे. यावर उपाय म्हणून सरकारने पुन्हा टोल फ्री नंबर जारी केले आहेत. या टोल फ्री नंबरवर फोन करून आपली तक्रार दाखल करू शकता, असे आवाहन देखील केले आहे. तसेच, राज्य पुरवठा आणि नियंत्रण कक्षाकडेही धान्य दुकानदाराची तक्रार नोंदविली जाऊ शकते. त्यासाठी, सरकारने टोल फ्री नंबर जारी केलाय. 1800-180-2087, 1800-212-5512 आणि 1967 या नंबरवर फोन करुन तुम्ही संबंधित दुकानदाराची तक्रार देऊ शकता.

कोरोनामुळे अनेक लोक बेरोजगार झाले. या काळात कोणत्याही व्यक्तीची उपासमार होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या वतीने रेशनकार्डवरील प्रति व्यक्तीस 5 किलो अन्न धान्य वितरण करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार हे धान्य वितरीत केले गेले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर महिन्यापर्यंत गरिबांना हे मोफत धान्य देण्याचे जाहीर केलंय. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी गरिबांची स्वस्त धान्य दुकानदारांकडून पिळवणूक होत असल्याचे आढळत आहे. कार्डधारकांना धान्य मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वस्त धान्य दुकानधारकांकडून रेशनच्या धान्याचा अधिक प्रमाणात काळाबाजार होतोय. या काळ्या बाजारातून धान्याची खरेदी-विक्री होत असल्याने गरिबांना कमी धान्य दिले जातंय किंवा दिले जात नाही, असे प्रकार उघडकीस येताहेत. त्यामुळे, कार्डधारकांना मोफत धान्य देण्यात येत नसेल तर संबधित जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रार नोंदवावी, असेही आवाहन करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण योजनेंतर्गत लॉकडाऊन काळात ही मोफत धान्य योजना सुरु केलीय. ज्या गरिब कुटुंबीयांकडे रेशनकार्ड नाही, अशांनाही रेशनचे धान्य देण्याचे सरकारने सांगितले आहे. या योजनेची व्याप्ती वाढविली असून नोव्हेंबर 2020 पर्यंत हे मोफत धान्य देण्याचे आदेश सरकारने दिलेत. मात्र, अद्यापही गरिबांना धान्य मिळत नसल्याचे समोर येत आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच्या काळात संक्रमण वाढू नये, म्हणून सुरक्षित अंतर राखणेही महत्त्वाचे आहे, पण रेशन धान्य दुकानात हाताचा अंगठा घेऊनच ऑनलाईन पद्धतीने रेशन दिले जातेय. यातून कोरोना विषाणूचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नुसत्या रेशन काडार्वर धान्य द्यावे, अशी मागणी कार्डधारकांकडून केली जात आहे.