जर रॉबर्ट वाड्रा राजकारणात उतरले तर कुठून लढवणार निवडणूक ? UP च्या ‘या’ दोन जागांवर ‘डोळा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गांधी परिवारातील बहुतांश सदस्य राजकारणात सक्रिय आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यादेखील राजकारणात आहेत. त्यानंतर आता सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा हेदेखील राजकारणात सक्रिय होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ते जर राजकीय मैदानात उतरले तर कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हा प्रश्न असेलच. पण आता त्यानुसार अंदाज बांधला जात आहे.

राजकारणात रॉबर्ट वाड्रा यांनी जर पाऊल टाकले तर ते उत्तर प्रदेशातून राजकारण सुरु करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यादेखील बऱ्याच कालावधीपासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय आहेत. इतकेच नाही तर 2022 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारीही त्या करत आहेत.

त्यानंतर राजस्थानची राजधानी जयपूरच्या प्रसिद्ध मोती डुंगरी गणेशजीच्या दरबारात जाऊन रॉबर्ट वाड्रा यांनी शुक्रवारी पहिले दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘सर्वांना वाटते की मी राजकारणात यावे. मात्र, त्याचीही योग्य वेळ येईल. कोण म्हणते की मी मुरादाबाद येथून निवडणूक लढवावी तर कोण म्हणते की मी गाझियाबाद येथून राजकारणात यावे’.

दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांच्या राजकारणातील प्रवेशावर खुद्द त्यांनीच वक्तव्य केले आहे. त्यामुळे प्रियांका गांधी यांच्यानंतर त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हेदेखील राजकारणात लवकरच प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ते कधी प्रवेश करणार आहेत याची माहिती दिली नाही.

उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी तयारी सुरु
काँग्रेसला उभारी देण्यासाठी आता खुद्द प्रियांका गांधी या मैदानात उतरल्या आहेत. त्यानुसार त्यांच्याकडून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी तयारी केली जात असून, त्यानुसार रणनीतिही आखली जात आहे. त्यामुळे भाजपला आता उत्तर प्रदेशच्या राजकारणात काँग्रेसचे आव्हान असेल हे आता दिसत आहे.