‘शरद पवारांनी मनावर घेतलं असतं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न केव्हाच मार्गी लागला असता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तात्काळ बैठक बोलवावी अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. येत्या 26 ऑगस्टला मराठा आरक्षणावर कोर्टामध्ये सुनावणी होणार असून मेटे यांच्या या मागणिला महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकार बेफिकीर असल्यासारखे वागत आहे. सरकार हे आक्षणाबाबत गंभीर नाही अशी टीका मेटे यांनी केला आहे. तसेच शरद पवार यांनी मनावर घेतलं असतं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न केव्हाच मार्गी लागला असता असं मत देखील मेटे यांनी व्यक्त केले आहे.

मेटे यांनी पुढे सांगितले, मराठा आरक्षणासंदर्भात जेव्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली तेव्हा ही सुनावणी आभासी घेऊ नये अशी मागणी राज्य सरकारने करावी यासाठी शिवसंग्राम पक्ष आणि मराठा समाजाच्या वतीने आग्रह धरण्यात आला होता. मात्र, सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केलं जेव्हा सरकारवर दबाव वाढला तेव्हा त्यांनी शेवटी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या सुनावणीला विरोध केल्याचे मेटे म्हणले. गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार यांना राज्यात जाणता राजा म्हणून ओळखले जाते. मात्र, मराठा समाजाच्या एवढ्या मोठ्या गंभीर प्रश्नावर त्यांनी कधीही वक्तव्य दिलं नाही.

तसेच राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मराठा आरक्षणाच्या बैठकीमध्ये ते कधीच उपस्थित राहिले नाहीत. शरद पवार यांनी पुढाकार घेतला असता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न कधीच मार्गी लागला असता, असे विनायक मेटे म्हणाले. महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून शरद पवार यांनी राज्यातील मराठा समाजाच्या जनतेला सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकेल असा विश्वास देयला हवा. या सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पुढाकार घ्यावा अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे.