सोमेश्वरने कार्यालयीन अधिक्षकांना मुदतवाढ दिल्यास उपोषण, शेतकरी कृति समितीचा इशारा

नीरा : पोलिसनामा आँनलाईन – सोमेश्वर सह.साखर कारखान्याचे कार्यालयीन अधिक्षक एस.पी.धुमाळ हे येत्या ३१ आँगस्टला सेवा निवृत्त होत आहेत. धुमाळ यांना मुदतवाढ देऊ नये अशी मागणी करून जर मुदतवाढ दिली तर शेतकरी कृती समिती कडून कारखान्यावर मोर्चा काढून उपोषण केले जाईल, असा इशारा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतिश काकडे यांनी दिला आहे.

सतिश काकडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या. पत्रकात म्हटले की, सोमेश्वर कारखान्याचे कार्यालयीन अधिक्षक एस.पी धुमाळ हे ३१ आँगस्टला सेवानिवृत्त होत असून त्यांंना मुदतवाढ देऊ नये. तसेच
कारखान्याने अद्यापि कार्यालयीन अधिक्षक पदाची जाहिरात दिलेली नाही. त्यामुळे चेअरमन वैयक्तिक हितसंबंध पाहून धुमाळ यांना मुदत वाढ देण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. त्यामुळे कारखान्याचे कार्यकारी संचालक व साखर आयुक्त कार्यालयास कारखान्याचे कार्यालयीन अधिक्षक एस.पी.धुमाळ यांना ३१ आँगस्टला सेवामुक्त करण्यात यावे यासाठी लेखी पत्र व्यवहार केलेला आहे.

मध्यंतरी कारखान्याचे फायनान्स मँनेजर कदम यांना मुदतवाढ देण्यासंबंधी संचालक मंडळात मतभेद झाले होते. त्यावर साखर आयुक्तालयाच्या निर्देशानुसार मुदतवाढ देणे नियम बाह्य असल्याने कदम यांना कार्यकारी संचालक यांनी मुदतवाढ दिलेली नाही. कायद्याला अनुसरून निर्णय घेतला. त्याचप्रमाणे धुमाळ यांना कोणतीही मुदतवाढ न देता त्यांनी घेतलेला जादा पगार व्याजासह वसूल करून तातडीने सेवेतून मुक्त करावे अशी मागणी काकडे यांनी केली आहे.

कारखान्याने जर कृती समितीने दिलेल्या निवेदनावर तात्काळ निर्णय न घेतल्यास कार्यकारी संचालक, चेअरमन व संचालक मंडळाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. होणारा सर्व खर्च वैयक्तिकरित्या वसूल केला जाईल. तसेच आंदोलनाची तीव्रता वाढवून वेळ प्रसंगी सभासदांंच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर मोर्चा व उपोषण करण्याचा इशारा काकडे यांनी दिला आहे.