राज्य सरकार पडणार हे तर भाजपा कार्यकर्त्यांसाठी गाजर !

कर्‍हाड : महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे सांगत भाजपा नेते कार्यकर्त्यांना गाजर दाखवत आहेत, आणि सरकार अस्थिर असल्याचे सांगून पक्षातील आमदारांना सोबत ठेवण्याचे काम करत आहेत. परंतु, राज्यातील सरकारने एक वर्ष पूर्ण केले असून हे सरकार आपला कार्यकाळही पूर्ण करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी कर्‍हाड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळास आदरांजली अर्पण केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

आघाडी सरकार मजबूत
अजित पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी निर्माण केली आहे. त्यांचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत सरकार मजबूत आहे. सत्तेवर कोणीही असले तरी विरोधी पक्षाला मात्र सरकार पडणार असल्याचे म्हणावेच लागते. 1995 मध्ये आमचे 80 आमदार होते. आम्ही विरोधात होतो. सत्ताधार्‍यांना धारेवर धरावे लागते. तेच आता भाजप करत आहे. विरोधकांना कार्यकर्ते सोबत ठेवायचे असतात. त्यासाठी सरकार पडणार, असे म्हणावेच लागते.

कोरोना काळात केंद्र पाठीशी उभे राहिले नाही
राज्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टिका केली. केंद्राची हवी तशी साथ मिळाली नसल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात पवार म्हणाले की, कोरोना काळात राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. केंद्राकडून 29 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांनी वारंवार पत्र पाठवली, पण दखल घेतली गेली नाही. नैसर्गिक संकटात केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी उभे राहिले नाही, असे पवार म्हणाले.