…तर शिख दंगल टाळता आली असती, माजी पंतप्रधानांच्या वक्तव्यानं खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गृहमंत्री नरसिंह राव यांनी इंद्रकुमार गुजराल यांचा सल्ला ऐकला असता तर दिल्लीत झालेली शिख दंगल टाळता आली असती असे वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं आहे. माजी पंतप्रधान गुजराल यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गुजराल हे 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998 या कालावधीत देशाचे पंतप्रधान होते.

मनमोहन सिंग म्हणाले की, ‘इंद्रकुमार गुजराल यांनी 1984 मधील शीख दंगली रोखण्यासाठी लष्कराचे जवान तैनात करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तत्कालीन गृहमंत्री नरसिंह राव यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. इंद्रकुमार गुजराल यांचा सल्ला गांभीर्यानं घेतला असता, तर 1984 ची दंगल टाळता आली असती. ‘

1984 मध्ये इंदिरा गांधी यांची त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये शिखविरोधी दंगली उसळल्या होत्या. या दंगलीत शेकडो शीख समुदायातील माणसांची हत्या करण्यात आली होती. देशात एकूण 3 हजारांहून अधिक लोक मारले गेले होते.