Pune News : वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माहिती द्या, महावितरणचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती व्हॉट्सअ‍ॅपद्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एकूण 293 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 220 तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले आहे. उर्वरित 73 तक्रारींमध्ये प्रशासकीय मंजुरीची गरज असल्याने त्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

दरम्यान, ऊस गळीत हंगाम सुरु असल्याने सध्या उसतोडणीचे काम वेगाने सुरु आहे. अनेक ठिकाणी लोंबकळणाऱ्या वीजतारांचे घर्षण होऊन किंवा इतर विद्युत कारणांनी ऊसाला आगी लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी वीजयंत्रणा धोकादायक असल्यास त्याची माहिती व्हॉट्स अ‍ॅपद्वारे दिल्यास महावितरणकडून तातडीने दुरुस्ती कामे करण्यात येणार आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगांव तालुक्यांसाठी 7875767123 तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी 7875768074 हा व्हॉट्सअ‍ॅप मोबाईल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त वीजवितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. या क्रमांकावर नागरिकांना कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉट्स अ‍ॅपद्वारे माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉट्स अ‍ॅप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.

महावितरणची वीजतार तुटलेली आहे. झोल किंवा जमीनीवर लोंबळकत आहे. फ्यूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकणे उघडी किंवा तुटलेले आहे. रोहित्रांचे कुंपण उघडे आहे. खोदाईमुळे भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे आदी स्वरुपाची माहिती/तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधीत स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह व्हॉटस् अ‍ॅपच्या मोबाईल क्रमांकावर नागरिकांना पाठवता येत आहे. त्यासोबतच महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर देखील सध्या सुरु असलेली ही सेवा उपलब्ध आहे.

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्राप्त झालेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधीत विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येत आहेत. त्याप्रमाणे वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधीत तक्रारकर्त्यांना व्हॉटस् अ‍ॅपद्वारेच दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येत आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजूरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीजसुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.