‘हिंमत असेल तर मोदींनी माझ्याशी डिबेट करावं’ : राहुल गांधींचं खुलं आव्हान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला. हम निभाऐंगे अशी या जाहीरनाम्याची नवी घोषणा आहे. या जाहीरनाम्याच्या प्रकाशनावेळी सोनिया गांधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला, प्रियंका गांधी. पी चिदंबरम, एच डी देवेगौडा आदी दिग्गज नेते उपस्थित होते. या जाहीरनाम्यात काँग्रेसने अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. या जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट खरी आहे असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीकाही केली. हिंमत असेल तर मोदींनी माझ्यासोबत भ्रष्टाचारासह अनेक मुद्द्यांवर डिबेट करावं.

‘हिंमत असेल तर त्यांनी भ्रष्टाचार आणि इतर अनेक मुद्द्यांवर माझ्याशी डिबेट करावं’
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरत आहेत म्हणून ते माध्यमांसमोर येत नाहीत. त्यांनी माध्यमांसमोर यायला हवं. माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारायला हवेत. नरेंद्र मोदी घाबरत आहेत म्हणून ते लपून बसतात. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी भ्रष्टाचार आणि इतर अनेक मुद्द्यांवर माझ्याशी डिबेट करावं असे म्हणत राहुल गांधींनी मोदींना खुलं आव्हान दिलं. मोदी नेहमीच काही ना काही खोटं बोलत असतात.” असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

जाहीरनाम्याविषयी बोलताना राहुल गांधी म्हणाले की…
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “काँग्रेसने प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात ५ महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. प्रत्येक गरिबाला वर्षाला ७२ हजार रुपये मिळतील. त्यामुळे गरिबी दूर होण्यास मदत होईल. रोजगार आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. रोजगाराच्या दृष्टीने मोठे पाऊल असेल ते म्हणजे छोट्या उद्योजकांना ३ वर्षासाठी परवानगीची गरज नाही. ज्याला जो व्यवसाय सुरु करायचा आहे तो तो व्यवसाय करू शकेल. शेतकरी कर्ज फेडू शकला नाही तर त्याला गुन्हेगारासारखं वागवलं जातं. मोठे उद्योगपती कर्ज बुडवून पळून जातात. त्यांना गुन्हेगारासारखं वागवलं जात नाही. त्यामुळे जर आता शेतकरी कर्ज देऊ शकला नाहीतर तो गुन्हा नाही असं या जाहीरनाम्यात सांगण्यात आलं आहे. 10 लाख बेरोजगार तरुणांना ग्रामपंचायतीत रोजगार निर्माण करून दिला जाईल. इतकेच नाही तर ६ महिन्यांमध्ये २२ लाख नोकऱ्या निर्माण करू. जाहीरनाम्यातील कोणतीच घोषणा खोटी नाही.” असेही ते राहुल गांधी म्हणाले.

यावेळी पंतप्रधान कोण होईल असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता, राहु गांधी म्हणाले की, “पंतप्रधान कोण होईल हे जनता ठरवेलच.” याशिवाय देशातील बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या जाहीरनाम्याच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे आहेत आणि त्या मुद्द्यांवर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.