तुम्हालाही आलाय का हा मेसेज ?, थांबा क्लिक करु नका, गृह मंत्रालयाकडून अलर्ट जारी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही महिन्यांपासून बँकिंग फ्रॉड (Banking Fraud) प्रकरणांत मोठी वाढ झाली आहे. सायबर चोरटे आरोपीची फसवणूक करण्यासाठी, त्यांना लुटण्यासाठी अनेक प्रकारच्या पद्धती अवलंबत आहेत. आता या स्कॅमर्सनी फसवणूकीची एक नवी पद्धत सुरू केली आहे. याबाबत गृह मंत्रालयानेच माहिती दिली आहे. सध्या फ्रॉस्टर्स लोकांना एसएमएस पाठवून त्यांचे बँक अकाउंट खाली करत आहेत. लोकांनी कोणत्याही मेसेजवर येणाऱ्या लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही लिंकबाबतचा मेसेज आल्यास, त्वरित त्यांची तक्रार सायबर क्राईम पोलिसात करावी, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सरकारने ट्विटर हँडल Cyber Dost वर ट्विट करून लोकांना फ्रॉड बाबतच्या नव्या पद्धतींबाबत सतर्क केले आहे.
सर्वात मोठा निशाणा डिजिटल बँकिंग आणि ऑनलाईन ट्रान्झेक्शन करणाऱ्यांना केले जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँक अकाउंटबाबत सावध राहणे अतिशय गरजेेचे आहे. वाढते फसवणुकीचे प्रकार पाहता वेळोवेळी बँका, आरबीआय आणि सरकारकडूनही याबाबत लोकांना सतर्क केलं जात आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊन आणि इतर निर्बंधांमुळे आर्थिक फसवणुकीला आळा बसला असेल असे वाटत होते. मात्र वस्तुस्थिती धक्का देणारी आहे. केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) वर्ष 2020 साठीच्या अहवालात म्हटले आहे की, 2019 मध्ये बँकांच्या फसवणुकीचे 91 प्रकार घडले होते ते पुढच्या वर्षी 196 झाले. वर्ष 2020 मध्ये सीबीआयकडे फसवणुकीची 543 प्रकरणे आली आहेत. त्यातील 196 ही बँकांच्या फसवणुकीची होती. लक्षणीय बाब म्हणजे गेल्या वर्षी बँक फसवणुकीत दिल्लीने मुंबईला मागे टाकले. सीबीआयने बँक फसवणुकीचे 50 पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले. त्यातील जवळपास 30 मुंबईतील होती. पुणे, नागपूर आणि चेन्नईत 17 गुजरातच्या गांधीनगरमध्ये 16 गुन्हे दाखल झाले.