‘असा चौकीदार असेल तर मुलींना पोलीस संरक्षणाची गरज लागेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसने अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना चौकीदार या शब्दाचा वापर केला आहे. चौकीदार चौर है अशा घोषणाही दिल्या आहेत. यानंतर आता या टीकेला उत्तर म्हणून सोशल मीडियावरून नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं आहे. मोदींनी त्यांच्या ट्विटरवरील नावापुढे चौकीदार शब्द लावला आाहे.

त्यांनी नावापुढे हा शब्द लावल्यानंतर भाजपाच्या सर्व मंत्र्यांनी, खासदारांनी तसेच इतर नेत्यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार हा शब्द जोडल्याचे पाहायला मिळाले. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक आमदारांनी ट्विटरवर नावात बदल केला. परंतु काँग्रेसने मात्र मोदी कॅम्पेनवर टीका केली आहे. असा चौकीदार असेल तर देशातील मुलींना पोलीस संरक्षणाची गरज लागेल असा टोला काँग्रेसने लगावला आहे.

काही दिवसांपू्र्वी भाजपाचे आमदार मुली पळवण्याच्या वक्तव्यावरून चर्चेत होते. राम कदम यांनीही आपल्या ट्विटरच्या नावात बदल करून चौकीदार राम कदम असे केले आहे. दरम्यान याचाच आधार घेत काँग्रेने मोदींच्या या कॅम्पेनवर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सिचन सावंत यांनी मोदी कॅम्पेनवर टीका करत भाजपाला टोला लगावला आहे. असा चौकीदार असेल तर देशातील मुलींना पोलीस संरक्षणाची गरज लागेल असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

सचिन सावंत यांनी याबाबत ट्विट केले आहे. राम कदम यांच्या ट्विटला त्यांनी उत्तर देत त्यांच्यावर आणि मोदींच्या कॅम्पेनवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर है या घोषणेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं त्यामध्ये मोदी म्हणाले की, “मी देशाची सेवा करण्यासाठी चौकीदार आहे. पण मी एकटा चौकीदार नाही तर भ्रष्टाचाराविरोधात लढणारा प्रत्येक जण चौकीदार आहे. जो देशाची प्रगती करण्यासाठी मेहनत करतोय, तो चौकीदार आहे. आज देशातील प्रत्येक नागरिक चौकीदार आहे असं म्हणत मै भी चौकीदार ही मोहीम ट्विटरवर सुरु केली आहे.”