उद्या शेतकर्‍यांच्या रॅलीत हिंसाचार झाल्यास…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन तीव्र होऊ लागले आहे़. प्रसत्ताकदिनाच्या दिवशी शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले आहे़. त्याला पोलिसांनी परवानगी दिली असून त्यामध्ये १२ हजार ट्रॅक्टर सहभागी होणार असल्याची माहिती आहे़ कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरादी घेतली आहे़.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एका शार्प शूटरला शेतकर्‍यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे़ यामुळे बंदी घातलेल्या सिख फॉर जस्टीस संघटनेचे दहशतवादी गुरुपतवंत सिंह पन्नू यांच्याकडून सीआयएसएफच्या कंट्रोल रुमला शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीबाबत धमकी देण्यात आली. जर उद्या शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये कोणताही हिंसाचार झाला तर त्याला संपूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला. २६ जानेवारीच्या आदल्या दिवशीच असा फोन आल्याने दिल्ली पोलीस आणि गुप्तहेर संघटना सतर्क झाल्या आहेत.

सिख फॉर जस्टीस ही भारतात बंदी घातलेली संघटना आहे. या संघटनेचे नाव आधीही शेतकरी आंदोलनाशी जोडले गेले होते. भारत सरकारने काही काळापूर्वीच गुरुपतवंत सिंह यांना दहशतवादी घोषित केले आहे. मोठ्या काळापासून ते खलिस्तानसाठी आवाज उठवत होते.

सीआयएसएफच्या कंट्रोल रुमला १३४७७९३४७६१ या क्रमांकावरून फोन आला होता. या कॉलवरून सांगण्यात आले की, सिंघू बॉर्डरवर पंजाबचे शेतकरी जमलेले आहेत. आम्हाला कोणतीही हिंसा नको आहे. जर या रॅलीमध्ये कोणतीही हिंसा झाली तर भारतच यासाठी जबाबदार असेल, अशी धमकी देण्यात आली आहे.

पाकिस्तान सक्रीय…
शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देण्यात आली असली तरी प्रजासत्ताक दिनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलीस अलर्टवर आहेत. दरम्यान, शेतकरी आंदोलनादरम्यान गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानमधून ३०८ ट्विटर अकाऊंट तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे़ या ३०८ ट्विटर अकाऊंटची पडताळणी पोलिसांकडून सुरू असून, हे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.