माझे मंत्रिपद घालविण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य झाले तरी ते मला मान्य : आठवले

मुंबई : वृत्तसंस्था – रोज नवीन रिपब्लिकन गट स्थापन करून समाजाचे भले होणार नाही. समाजाला सत्ता मिळविण्यासाठी एकच रिपब्लिकन पक्ष असला पाहिजे. माझे मंत्रिपद घालविण्यासाठी जरी रिपब्लिकन ऐक्य झाले तरी माझी या ऐक्यासाठी तयारी आहे. मात्र ऐक्य करून माझे मंत्रिपद घालविण्यापेक्षा आणखी मंत्रीपदे मिळविण्यासाठी समाजाला शासनकर्ती जमात बनविण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य करावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

चैत्यभूमी येथील अशोकस्तंभासमोर उभारलेल्या विचारमंचावर रिपाइं मुंबई प्रदेशाच्या वतीने नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

मला मंत्रीपद मिळते म्हणून काहींच्या पोटात दुखते. मंत्रिपद कसे मिळवायचे हे त्यांना नाही कळत, म्हणून मंत्रिपद त्यांना नाही मिळत अशी चारोळी सादर करून रामदास आठवलेंनी विरोधकांना टोला हाणला. सत्कारापूर्वी सांताक्रूझ विमानतळ ते दादर चैत्यभूमीपर्यंत रामदास आठवले यांची रथाद्वारे भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रिपब्लिकन कार्यकर्ते उपस्थित होते. निळे झेंडे ढोल ताशा आणि आतषबाजीत रिपाइं तर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानासमोर नतमस्तक होऊन अभिवादन केले. मोदी आणि भाजप हे सांगतात की ते संविधान बदलणार नाहीत. अनुसूचित जातीजमातीचे आरक्षण संपविणार नाही. संविधान आणि आरक्षणाचे ते रक्षण करतील असे आश्वासन मोदी देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपमध्ये परिवर्तन झाले आहे. एखाद्यामध्ये परिवर्तन होणारच नाही असा नकारात्मक विचार करणे योग्य नाही हे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी समाजाला समजावून सांगितले पाहिजे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.