जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील जवळपास सर्व महत्त्वाच्या देशांच्या प्रमुखांनी कोरोनावरील लस टोचून घेतली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन, उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी लस घेतली आहे. ब्रिटनमध्ये राणी एलिझाबेझ आणि पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लस टोचून घेतली आहे. इतरही देशांच्या प्रमुखांनी कोरोना लस घेतली आहे. मग भारतात सरकारमधील कोणत्याही जबाबदार व्यक्तीने लस का घेतली नाही? कोरोना लस सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे ना? मग सरकारमधील व्यक्ती लस टोचून घेण्यात मागे का?, असा सवाल कॉंग्रेसचे खासदार मनिष तिवारी यांनी उपस्थित केला आहे.

देशभरात आजपासून शनिवार (दि. 16) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केला. मोदींकडून सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेवर काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांची आवश्यक असताना त्या न करता कोरोना लसींच्या वापरास परवानगी दिल्याचे खासदार तिवारी यांनी म्हटले आहे. कोरोना लस इतकी परिणामकारक आहे, मग सरकारमधील कोणत्याही महत्त्वाच्या नेत्याने ती का घेतली नाही, असा सवाल लोकसभेत आनंदपूर साहिबचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तिवारींनी उपस्थित केला आहे.

लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देणारी कोणतीही ठोस चौकट आपल्याकडे नाही. पण तरीही आपत्कालीन स्थितीत दोन लसींच्या मर्यादित वापरास परवानगी दिली गेली. कोवॅक्सिनची गोष्ट तर वेगळीच आहे. चाचणी प्रक्रिया पूर्ण न करताच कोवॅक्सिनच्या वापरास मंजुरी दिली गेल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.