Pune News : … तर कदाचित ‘सीरम’मधील अनर्थ टाळता आला असता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या इमारतीत उत्तम दर्जाची ‘फायर फायटिंग सिस्टीम’ असतानाही ही आग भडकली. हि आग भडकण्याची कारण अस्पष्ट आहे. त्यातच अग्निशमन दलाला कधी वर्दी देण्यात आली याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीची घटना वेळेत अग्निशामक दलाला कळविण्यात आली असती, तर कदाचित पुढील अनर्थ टाळता आला असता. ही घटना कळविण्यात उशीर झाला असण्याची शक्यता अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. दरम्यान अधिकाऱ्यांनी वर्तवलेल्या शक्यतेमुळे अनेक प्रश्न समोर आले आहे. आग लागल्यानंतर स्फोटाचे आवाज आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु, स्फोट नेमके कशाचे झाले हेच समजत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे महापालिका आणि पीएमआरडीए या दोन्ही अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग लागल्याचे पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाला २ वाजून ३३ मिनिटांनी कळविण्यात आले. तर, पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाला २ वाजून ३५ मिनिटांनी ही माहिती समजली. या इमारतीत उत्तम दर्जाची ‘फायर फायटिंग सिस्टीम’ आहे. आग लागली तेव्हा ही सिस्टीम सुरूही झाली होती. परंतु, आगीचे प्रमाण अधिक असल्याने आग या सिस्टीमद्वारे आटोक्यात आणणे अवघड झाले असावे. याच सिस्टीममधील पाण्याचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, दुसरीकडे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आग लागल्यानंतर आठच मिनिटांत अग्निशामक दलाला कळविल्याचे सांगितले.

घातपात की अपघात? आत्ता भाष्य नकोच : मुख्यमंत्री
सीरम इन्स्टिट्यूटला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. भेटींनंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. ही आग म्हणजे अपघात होता, की घातपात यावर आत्ता भाष्य नको. तपास पूर्ण होऊ द्या, अहवाल येईपर्यंत निष्कर्ष काढायला नको. त्यांनी यावेळी सांगितले. मृत्यू झालेल्यांची संपूर्ण जबाबदारी ‘सीरम’ने घेतली आहे. आवश्यकता पडल्यास सरकारही मदत करेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.