सरकार 5 वर्ष टिकवण्यासाठी स्वतः शरद पवारांनी सांगितला ‘फॉर्म्युला’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सल्ला दिला आहे की राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार जर पाच वर्षे टिकावयचं असेल तर सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांशी समन्वय ठेवावा. तसेच असे वक्तव्य देखील टाळावे की ज्याने सरकार आणि पक्षात मतभेद निर्माण होतील.

शरद पवार हे मुंबईमधील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी समन्वय ठेवण्यास सांगितले तसेच वादग्रस्त मुद्दे टाळण्यास सांगितले. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांसह खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील यांची देखील उपस्थिती होती.

यावेळी शरद पवारांनी मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला आणि ज्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात संपर्कमंत्र्याची नेमणूक केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी याबाबत खुलासा केला की महामंडळावर नियुक्तीसाठी ज्या कार्यकर्त्यांची नावं जिल्हा कार्यकारणीकडून येतील त्यांच्याच नावांचा विचार करण्यात येईल आणि त्यांना महामंडळावर संधी मिळेल असे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

दरम्यान या बैठकीत एनपीआरला विरोध नसल्याचे देखील सांगण्यात आले. असे असले तरी एनपीआरसंबंधी ठोस असा निर्णय न घेता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन याबाबत निर्णय घ्यावा असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

तसेच या बैठकीत कोरेगाव – भीमा हिंसाचार प्रकरणाबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनआयए कडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे शरद पवार नाराज असल्याचे दिसून आले. कारण शरद पवारांचे म्हणणे होते की या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून करण्यात यावा. मात्र हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला त्याबद्दल शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर आपली नाराजी दर्शविली होती. मात्र या प्रकरणाचा समांतर तपास राज्य सरकार एसआयटी मार्फत देखील करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.