..तर तिहेरी तलाक कायदा रद्द करू !

दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले असून, सत्तेत येण्यासाठी विविध पक्ष घोषणांचा पाऊस पाडत आहेत. याचदरम्यान काँग्रेसनेही घोषणाबाजीचा पाऊस पडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आज एका जाहीर सभेत काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास तिहेरी तलाक कायदा रद्द करू अशी घोषणा काँग्रेसने केली आहे. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी ही घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसची ही मोठी घोषणा आहे. दिल्ली येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुष्मिता देव बोलत होत्या तेव्हा त्यांनी घोषणा केली.
मुस्लिम मतदार वर्गाला डोळ्यासमोर ठेऊन, तिहेरी तलाक कायदा रद्द करण्याबाबत काँग्रेसने ही घोषणा केली आहे. भाजपने लोकसभेच्या विरोधी सदस्यांच्या मागणीवरून तिहेरी तलाकचे विधेयक दुरुस्त करून लोकसभेत मांडून मंजूर करून घेतले होते. मात्र हे विधेयक राज्यसभेत अद्याप प्रलंबित आहे. म्हणून केंद्र सरकारने या कायद्याचा दुसऱ्यांदा अध्यादेश काढला आहे. या कायद्यात पतीने तिहेरी तलाक दिल्यास त्याला तीन वर्षाचा तुरुंगवास असणारी शिक्षेची तरतूद काँग्रेससहित विरोधातील अनेक पक्षांना मान्य नाही. या मुद्द्याचे भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीत राजकारण केले जाणार हे निश्चित मानून काँग्रेसने तिहेरी तलाकला रद्द करण्याची घोषणा आज केली आहे. यामुळे मुस्लिम मतदार वर्ग काँग्रेसकडे आकर्षित होईल असं काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे काँग्रेसने याबाबत घोषणा केली आहे.