तुम्हीसुद्धा विनाकारण व्हिटॅमिनच्या गोळ्या घेत असाल तर ‘हे’ अवश्य वाचा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या शंभर वर्षात जग बरंच बदललं आहे. व्हिटॅमिनच्या गोळ्या या बदलाचाच एक भाग आहे. शंभर वर्षामध्ये व्हिटॅमिनच्या गोळ्या अब्जावधी डॉलर्सची एक बाजारपेठ बनल्या आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी व्हिटॅमिन्स अतिशय महत्त्वाचे समजले जाते. पण म्हणून आपल्यापैकी प्रत्येकानेच या गोळ्या घेण्याची आवश्यकता आहे का ? या गोळ्या अनेक लोकांच्या आयुष्याचा भाग कशा बनल्या, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणं खूप रोचक आहे.

शंभर वर्षापूर्वी ज्या गोळ्यांचं नावही कधी ऐकलं नव्हतं. त्या गोळ्या आता वेगवेगळ्या वयोगटातले लोक फूड सप्लिमेंट म्हणून घ्यायला लागले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेसाठी काम करणाऱ्या डॉक्टर लीसा रोजर्स यांच्या मते, 17 व्या शतकात शास्त्रज्ञांना पहिल्यांदा जाणवलं, की प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट्सव्यतिरिक्तही खाण्या-पिण्यात असे काही घटक आहेत, जे चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.

डॉक्टर लीसा रोजर्स यांनी सांगितले, त्या काळात शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की, सागरी प्रवासाला जाणाऱ्या खलाशांना खाण्यासाठी ताजी फळं आणि भाज्या मिळत नाहीत. खाण्यपिण्यातील या कमतरतेमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो. मात्र व्हायटल-अमिन्स ज्यांना आपण सध्याच्या काळात व्हिटॅमिन म्हणून ओळखतो, त्याचं महत्व शास्त्रज्ञांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीला लक्षात आलं.

आपल्या शरीराला 13 वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. व्हिटॅमिन ए, सी, डी, ई आणि के. त्याशिवाय व्हिटॅमिन बी आहे, ज्याचे आठ वेगवेगळे प्रकार आहेत. हे सर्व मिळून 13 व्हिटामिन्स होतात. प्रत्येक व्हिटॅमिनचा गुणधर्म वेगळा आहे आणि चांगल्या आरोग्यासाठी हे सर्व व्हिटॅमिन योग्य प्रमाणात शरीराला मिळणं आवश्यक आहे. यापैकी डी व्हिटॅमिन आपल्याला सूर्यप्रकाशाद्वारे मिळतं. मात्र, बाकीचे व्हिटॅमिन आहारातूनच मिळतात.

डॉक्टर लीसा रोजर्स यांच्या मते, जगभरात दोन अब्जाहून अधिक लोकांना व्हिटॅमिन किंवा मिनरलची कमतरता भासते. यातील बहुतांश लोक हे आफ्रिका आणि अग्नेय आशियामध्ये राहतात. लहान मुलांमध्ये व्हिटॅमिनची कमतरता ही जीवघेणी ठरु शकते. कारण जेव्हा मुलं आजारी पडतात किंवा त्यांना कोणताही संसर्ग होतो, तेव्हा भूक कमी होते आणि जर काही खाल्लं तरी शरीर पोषक तत्त्व ग्रहण करु शकत नाही.

विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे, मात्र तरीही अजून व्हिटॅमिन्सबद्दल अनेक गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे. आपल्या बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अजूनच गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.