उमेदवारी दिली नाही, तर अपक्ष लढणार : डॉ. सुजय विखे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मला उमेदवारी नाकारली, तर अपक्ष म्हणून लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार. परंतु, मात्र भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे डॉ. सुजय विखे यांनी भाळवणी येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात सांगितले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केरूभाऊ रोहकले यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडला. पारनेरचे सभापती राहुल झावरे, डॉ. भास्कर शिरोळे, राहुल शिंदे, वसंत सालके, सुलतानभाई शेख, डॉ. भाऊसाहेब खिलारी, सचिन वराळ, भाऊसाहेब रोहोकले, दगडू कपाळे, डॉ. विनायक सोबले, मारूती रेपाळे, डॉ. अजय येणारे, दिनेश बाबर, रामचंद्र मांडगे आदी उपस्थित होते.

डॉ. विखे म्हणाले, माझ्या उमेदवारीस विरोध केला जात आहे, कारण मी सामान्य माणसाचा आवाज आहे. प्रत्येक पक्षात चांगले व वाईट लोक असून राजकारण हा खोटे बोलण्याचा धंदा झाला आहे. काँग्रेस आघाडीने उमेदवारी दिली तर ती नम्रपणे स्वीकारीन. मात्र कोणत्याही पुढाऱ्यासोबत रात्रीतून सेटलमेंट करणार नाही. मी खासदार होणार किंवा नाही हे जिल्हयातील चार पुढारी ठरवू शकत नाहीत. मतदारसंघातील साडेसतरा लाख मतदार ते ठरवतील.

खोलीत बसून आदेश देणारे पुढारी माझे काहीच वाकडे करू शकणार नाहीत. आदेश देणारे वेडे व ते घेणारे त्यापेक्षाही वेडे, अशी खिल्ली उडवित असे आदेश ऐकून गेली 15 वर्षे मतदार संघात कधीही न फिरणारा, लोकसभेत न बोलणारा मुका व अदृष्य खासदार तुम्ही निवडून दिला आहे. माझ्या आजोबांवर, कुटुंबावर सामान्य माणसाने अतोनात प्रेम केले त्यांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आपण निवडणुकीत उतरणार आहोत. माझा विरोध दिलीप गांधी यांना नाही. त्या पदावर बसलेल्या व्यक्तीचा उपयोग जनकल्याणसाठी झाला पाहिजे. दुर्देवाने त्या पदाचा उपयोग टक्केवारी गोळा करण्यासाठी होतो आहे, असे ते म्हणाले

डॉ. सुजय विखे स्वकर्तृत्वावर मते मागतो आहे. आजोबा तसेच वडील विरोधी पक्षनेते आई जि. प. अध्यक्ष यांचा मुलगा म्हणून कुटुंबाच्या पुण्याईवर लोकांपुढे गेलो नाही. महाराष्ट्रातील सर्वात उच्चशिक्षित पुढारी म्हणून माझी ओळख आहे. सगळे सुख, संसार त्यागून सामान्यांना न्याय देण्यासाठी मी राजकारणात पाऊल टाकले असल्याचे विखे यांनी सांगितले.