‘अंगावर आले तर शिंगावर घेऊ.’

मुंबई ; पोलीसनामा ऑनलाईन – नीलेश राणे यांनी सोमवारी शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरुन त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. यानंतर नीलेश राणे यांच्यावर शिवसैनिकांनी टीकेची झोड उठवली असतानाच त्यांच्या समर्थनार्थ त्यांचे बंधू आणि आमदार नितेश राणे हे मैदानात उतरले आहेत. अंगावर आले तर शिंगावर घेणारच, आमच्या नादी लागायचं नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, आम्ही सगळे आमचे नेते नीलेश राणेंच्या मागे आहोत, अंगावर आले तर शिंगावर घेणारच, आमच्या नादी लागायच नाही. नितेश राणेंनी या ट्विटद्वारे शिवसेनेला इशाराच दिला आहे.


काय म्हणाले होते नीलेश राणे ?
‘नारायण राणे आणि आम्ही आजपर्यंत शिवसेनेविरोधात बोलताना एक मर्यादा पाळली. बाळासाहेब ठाकरेंवर आम्ही कधीही आरोप केले नाहीत. आमच्या राणेसाहेबांचं आजही बाळासाहेबांवर प्रेम होतं मात्र ते ते व्यक्त करु शकले नाहीत. मी राणे साहेब म्हणत असलो तरी ते आधी माझे वडिल आहेत. त्यांचा जर जाहीर कार्यक्रमात कोणी अपमान करीत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही’, असे नीलेश राणे यांनी म्हटले होते.
आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचल्याचे आणि त्यांचा मृत्यू रुग्णालयात झाल्याचे भासवण्यात आले. हे दोन शिवसैनिकांना सहन झाले नाही, त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी कोणाला आदेश दिले. ही केस कशी दाबली गेली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.