चोरी नाही तर चोरीचे काम सोडल्यामुळे खून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चोरीचे काम सोडल्याच्या करणावरुन एका इसमचा खून केल्याची धक्कादायक घटना ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. फकीर मोहम्मद उर्फ सर्फराज असे खून झालेल्या इसमाचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी अन्वर मियां शेख याला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.११) सायंकाळी घडली होती. याप्रकरणी आरोपीला अटक केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली.

मयत सर्फराज हा रेल्वे आणि बसमध्ये प्रवाशांचे पाकिटमारी करीत होता. पाकिटमारी करीत असताना पोलिसांनी सर्फराजला अटक केली होती. या गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून तो बाहेर आल्यानंतर त्याला पश्चाताप झाल्याने त्याने पाकिटमारी करण्याचे सोडले होते. दरम्यान, आरोपी अन्वर मियां शेख याने सर्फराज याने चोरी करण्यासाठी का जात नाही तसेच चोरीचा मुद्देमाल का आणून देत नाही अशी विचारणा सर्फराजकडे केली. यावरुन दोघांमध्ये वाद झाले. याच वादातून अन्वरने सर्फराजला बेदम मारहाण करुन धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये सर्फराजचा मृत्यू झाला.

सर्फराजने चोरी करणे सोडल्याने अन्वरला पैसे मिळत नव्हते. तसेच तो न सांगता धंदा करत असल्याचा संशय अन्वरला होता. यातूनच अन्वरने त्याचा खून केला असल्याचा संशय नातेवाईकांनी केला. पुढील तपास ट्रॉम्बे पोलीस करत आहेत.