पंतप्रधान मोदींमध्ये हिम्मत असेल तर फक्त १५ मिनिटे समोरासमोर यावे : राहुल गांधी

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये सच्चाई ऐकण्याची हिंमत असेल, तर रेसकोर्ससह कुठल्याही ठिकाणी त्यांनी माझ्यासोबत चर्चेसाठी १५ मिनिटे समोरासमोर यावे. आताही नरेंद्र मोदींना माझे थेट आव्हान आहे. असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हंटले आहे. नांदेड लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी म्हंटले.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान नांदेड लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नोटाबंदी आणि गब्बरसिंग टॅक्समुळे आज करोडो लोक बेरोजगार झाले आहेत. मोदींच्या या मनमानी कारभारामुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. मागील ४५ वर्षांत सर्वाधिक बेरोजगारीही त्यांच्याच काळात नोंदविली गेली आहे. मोदींनी देशासमोर येऊन यासाठी जाहीर माफी मागितली पाहिजे. मी पंतप्रधान नाही तर चौकीदार आहे असे मोदी ओरडत आहेत. हे खरे आहे. मागील पाच वर्षांत मोदींनी केवळ अनिल अंबानींचीच चौकीदारी केली आहे. मोदींना आता पंतप्रधान करु नका तर त्यांना चौकीदार म्हणूनच ठेवा. असे राहुल गांधी यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, भाजपा सरकारने ५२६ कोटींचे राफेल विमान १६०० कोटींना का घेतले असा सवाल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत केला होता. मात्र त्यावेळी मोदींनी दीड तास भाषण केले परंतु राफेलसह एकाही प्रश्नाचे उत्तर ते देवू शकले नाहीत. प्रश्नाचे उत्तरच सोडा ते दीड तासात डोळ्यात डोळे घालून बोलू सुद्धा शकले नाहीत. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझे थेट आव्हान आहे. सच्चाई ऐकण्याची हिंमत असेल, तर रेसकोर्ससह कुठल्याही ठिकाणी त्यांनी माझ्यासोबत चर्चेसाठी १५ मिनिटे समोरासमोर यावे. त्यांना संपूर्ण देशासमोर उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. मोदींनी लोकांच्या खिशातील पैसे काढून घेतले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल खरेदी बंद केली. पर्यायाने कारखाने बंद झाले आणि त्यातून बेरोजगारी वाढली. यावर मात करण्यासाठी आम्ही आता देशातील आर्थिक दुर्बल ५ कोटी लोकांच्या खात्यावर दरवर्षी ७२ हजार रुपये टाकणार असून याचा फायदा देशातील २५ कोटी लोकांना होईल. असेही त्यांनी म्हंटले. तसेच, विचारलेल्या प्रश्नांपासून मोदी पळ काढत आहेत. एवढेच कशाला प्रसार माध्यमांसमोर येऊन बोलण्याचे धाडसही त्यांच्यात नाही. कारण गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराशिवाय त्यांनी काहीच केले असेही त्यांनी म्हंटले.

यावेळी, अशोक चव्हाण, सुभाष वानखेडे, मच्छिंद्र कामंत, मुकुल वासनिक, मधुसुदन मिस्त्री, संपत कुमार, माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, राजेंद्र दर्डा, कमलकिशोर कदम आदी उपस्थित होते.