‘त्यांच्या’कडे नुसतं पाहिलं तरी डोळे फोडू ; बोट दाखवलं तर बोट तोडू : केंद्रीय मंत्र्याचा इशारा

गाझीपूर : वृत्तसंस्था – भाजप कार्यकर्त्यांकडे बोट दाखवल्यास त्याचे बोट धड राहणार नाही. आणि डोळे वटारून पाहिल्यास त्याचे डोळे धड राहणार नाहीत. असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाझीपूरमध्ये आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. देशात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाझीपूरमध्ये केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांची गुरुवारी जाहीर सभा झाली त्यावेळी, त्यांनी विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले. भाजपाचे कार्यकर्ता गुन्हे आणि भ्रष्टाचाराला मुळापासून उखडण्यासाठी तयार आहेत. जर त्यांच्यावर कोणीही बोट दाखवल्यास त्याचे बोट पुढील ४ तासांत धड राहणार नाही याची ग्वाही देतो. इतकेच नव्हे तर, कोणी पुर्वांचलचा गुन्हेगार ज्याची गाझीपूरची सीमा ओलांडण्याची लायकी नाही. त्याने येऊन कार्यकर्त्यांशी नजर भिडवल्यास त्याचा डोळा धड राहणार नाही याची सुद्धा ग्वाही देतो. असे केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, निवडणुकी दरम्यान वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर निवडणूक आयोग कारवाई करत आहे. मात्र निवडणूक आयोगाच्य कारवाईचा नेत्यांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या पुढील काळात वादग्रस्त वक्तव्ये थांबवण्यासाठी निवडणूक आयोग काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.