‘पुरावे हवे असतील तर पाकिस्तानात जाऊन बघा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशभरातून हवाई दलाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्यात आले. परंतु यानंतर अनेक विरोधकांनी मोदींना याबाबत पुरावे मागितले आहेत. अनेकांनी मोदींवर पुराव्याच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनीही परवा (रविवार दि ३ मार्च) ट्विट करत मोदींनी पुरावे द्यावेत अशी मागणी केली होती. आम्हाला एअर स्ट्राईकमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह पाहायचे आहेत असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यांच्या ट्विटला आता केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हाला जर एअर स्ट्राईकचे पुरावे हवे असतील तर पाकिस्तानमध्ये जाऊन बघा अशा शब्दात राठोड यांनी सिब्बल यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. आज राठोड यांनी ट्विट केले आहे.

कपिल सिब्ब्ल यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना राजवर्धन राठोड म्हणाले की, “तुम्हाला आपल्या गुप्तचर संघटनांपेक्षाही आंतरराष्ट्रीय माध्यमांवर जास्त विश्वास आहे का? जेव्हा तुमच्याद्वारे उद्धृत केलेल्या मीडिया “स्ट्राइकमध्ये कोणतेही नुकसान झाले नाही” असे सांगतो तेव्हा ते ऐकून तुम्हाला आनंद होत आहे का?” असे सवाल राठोड यांनी उपस्थि केले आहे. पुढे बोलताना आपल्या ट्विटमध्ये राठोड म्हणतात की, “सिब्बल सर तुम्ही इव्हीएमचे पुरावे गाेळा करण्यासाठी लंडनला गेला होतात तर आताही एअर स्ट्राईकच्या पुराव्यासाठी तुम्ही बालाकोटला जाल का?” असा सवाल विचारत पुरावे हवे असतील तर पाकिस्तानला जाऊन बघा असा टोलाच लगावला आहे.

दरम्यान कपिल सिब्बल यांनी एअर स्ट्राईकेच पुरावे मागणारे ट्विट करताना मोदींना उद्देशून म्हटले होते की, “तुम्ही दहशतवादावर राजकारण करू नये. गुप्तचर यंत्रणेला इतके मोठे अपयश आले त्याला जबाबदार कोण आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई केली. तुम्ही राजकारण करत आहात. आम्हाल एअर स्ट्राईकमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह पाहायचे आहेत. यामुळे देशातील जनतेला आणि शहिदांच्या कुटुंबीयांनाही समाधान लाभेल”