मनसेने साधला राष्ट्रवादीवर निशाणा; म्हटले…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) राजकारण रंगले आहे. बारामतीत राज्यपालांनी लक्ष घालावे, अशी मागणी मनसेने केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेवर टीका केली. मनसेने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले, की ‘जर सामाजिक कामे करून तुमचे हात दुखत असतील तर आता थोडा भार आमच्या खांद्यावर द्या’

राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा देण्यात अडचण होत आहे. त्यानंतर आता बारामतीतही कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपडत आहेत. याच मुद्यावरून मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर यांनी यावर भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘रेमडेसिव्हिर देताना जवळच्या लोकांना प्राधान्य दिले जात होते. त्यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नव्हते. अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क करुनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न म्हणुन राज्यपालांशी संपर्क साधला. यामध्ये पवार किंवा बारामतीला बदनाम करण्याचा कोणताही हेतू नव्हता’.

दरम्यान, बारामतीत कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिव्हिर इंजेक्शन न मिळाल्याने आमच्याशी संपर्क साधत होते. याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली. अजितदादांना राज्याचा व्याप असल्याने त्यांना संपर्क करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी होत नव्हता. त्यामुळे घटनात्मक प्रमुख म्हणुन कोरोनाबाधितांना न्याय मिळवुन देण्यासाठी राज्यपालांना पत्र पाठविले. यामध्ये कोणाचा अवमान करण्याचा प्रश्नच नाही. तो हेतू देखील नव्हता, असेही पाटसकर यांनी सांगितले.