देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर राज्याला अधिक फायद्याचं : एकनाथ खडसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टिपण्णी करताना खोचक टोला लगावला आहे. दिल्लीत येणं, न येणं हे फडणवीसांच्या मर्जीवर नाही, वरिष्ठ नेत्यांनी ठरवलं तर तसा निर्णय होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत आले तर आनंदच होईल, स्वागत करेन. शिवाय ते दिल्लीत आले तर महाराष्ट्राला अधिक उपयोगच होईल, असा खोचक टोला त्यांनी लगावला. एकनाथ खडसे वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. माझा फोन टॅप करण्याची काय गरज होती.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोन टॅपिंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यातच एकनाथ खडसे यांचा देखील फोन टॅप झाल्याचे वृत्त मध्यंतरी आले होते. यावर बोलताना खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, माझा फोन टॅप केला असेल तर ते दुर्दैवी आहे. विरोधी पक्षनेते पदावर काम करताना त्या काळात फोन टॅपिंग होत असल्याचे अधिकाऱ्यांकडून ऐकले होते. पण नंतर मी सत्ताधारी पक्षात होतो. तेव्हा माझ्यावर फोन टॅपिंगने पाळत ठेवण्याची काय गरज होती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील आहेत. राज्यात शिवसेनेच्या मदतीने आता सरकार स्थापन करणे शक्य नसल्याने फडणवीस यांचा केंद्रात उपयोग करुन घ्यावा, असे भाजप श्रेष्ठींचे मत आहे. तसेच, सध्या राज्यसभेवर असलेले अमर साबळे पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. माजी खासदार अजय संचेती यांच्या नावाचीही चर्चा सुरु असून, उदयनराजे भोसले यांचेही प्रयत्न सुरु आहेत.