वृत्तपत्र विकून शिक्षण घेतले – बनला IFS ऑफिसर, तुमचा दृष्टीकोन बदलेल ‘या’ अधिकार्‍याची कथा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घरात आठ भाऊ-बहिण, वडिलांना दारूचे व्यसन, घर चालवण्यासाठी वृत्तपत्र विकावे लागणे, अशा परिस्थितीत आयएफएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणे शक्य आहे का? परंतु, पी बालमुरुगन यांच्यासारखे लोक हे करून दाखवतात. आयएफएस अधिकारी पी बालमुरुगन यांच्याबाबत तुम्ही जाणून घेतले तर तुमचा सुद्धा विचार करण्याचा दृष्टीकोन बदलून जाईल.

चेन्नईच्या किलकट्टलाईमध्ये जन्मलेले बालमुरुगन यांनी त्याकाळी आपल्या शिक्षणासाठी वृत्तपत्रे विकली होती. नंतर एका प्रसिद्ध कंपनीतील नोकरी सोडून यूपीएससीद्वारे भारतीय वन सेवेत (आयएफएस) दाखल झाले. सध्या ते राजस्थानच्या डूंगरपुर वन विभागात परिविक्षाधीन अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत आहेत.

बालमुरुगन सांगतात 1994 च्या सुमारास त्यांचे वडिल घर सोडून गेले होते. घरात माझ्याशिवाय सात भाऊ-बहिण होते, ज्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी माझी आई पलानीमलवर आली होती. केवळ 10 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या आईकडे कोणताही पर्याय नव्हता. तेव्हा तिची इच्छा होती की, आम्ही किमान आमच्या पायावर उभे राहावे.

बालमुरुगन सांगतात की, एक तो काळ होता जेव्हा मी न्यूजपेपर वेंडरकडे तामिळ पेपर वाचायला मागितला, तेव्हा त्याने मला मंथली 90 रुपये भरून सदस्यत्व घेण्यास सांगितले, मी त्याला सांगितले माझ्याकडे पैसे नाहीत, तेव्हा त्याने मला 300 रुपयांचा जॉब ऑफर केला, जी माझ्यासाठी कदाचित चांगली ऑफर होती.

अशा कठिण स्थितीत त्यांच्या मामाने सुद्धा कुटुंबाची मदत केली. त्यांच्या आईने तिचे दागिने विकून चेन्नईमध्ये एक छोटी जागा घेतली. जिथे गवताच्या छताखाली संपूर्ण कुटुंब राहू लागले. हा त्यांच्या संघर्षाचा तो काळ होता जेव्हा बालमुरुगन परिस्थितीतून शिकून पुढे जाण्याचा विचार करत होते. या संपूर्ण प्रवासात त्यांची आई त्यांची खरी ताकद बनली, जिने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्या खरेदी केलेल्या जमिनीचाही काही भाग विकला.

बालमुरुगन सांगतात की, त्यांनी नऊ वर्षाच्या वयात वृत्तपत्र विकून आपल्या फीसाठी पैसे जमवण्यास सुरूवात केली होती. त्याच काळात शिक्षणाची गोडी लागली. ही गोडीच युपीएससीच्या तयारीसाठी उपयोगी पडली. त्यांनी मद्रास इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेन्नईतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्यूनिकेशन ब्रँचमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

ग्रॅज्युएशननंतर त्यांनी टीसीएस जॉईन केले. त्यांचे पॅकेज लाखो रूपयांत होते. परंतु, एक असा प्रसंग घडला जेव्हा एका आयएएस ऑफिसर आणि प्रशासकीय कामांनी त्यांना खुप प्रभावित केले आणि त्यांनी सिव्हिल सर्व्हिसची एग्झाम देण्याचे स्वप्न पाहिले.

माझ्यासाठी हे खुप कठिण होते की, नोकरी सोडून पुन्हा जमीनीवर यायचे आणि अभ्यास सुरू करायचा. अखेर विचार करून मी नोकरी सोडली, यासाठी कुटुंबाने साथ दिली. मी यूपीएससीच्या तयारीसाठी लाखो रूपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून चेन्नईत शंकर आयएएस अकॅडमीत अ‍ॅडमिशन घेतले आणि तयारी सुरू केली. मात्र, तोपर्यंत माझ्या घरातील परिस्थिती खुप सुधारली होती. कारण, मोठी बहिण कमावती झाली होती.

बालमुरुगन म्हणतात की, जीवन मुल्यांकडून मी हेच शिकलो की जर काही मिळवण्याची इच्छा आहे तर ते पूर्ण मनापासून करा. एकवेळ उपाशी झोपा, पण अभ्यास केल्याशिवाय कधीही झोपू नका. नेहमी मोठे लक्ष्य असेल तरी खूप बलिदान द्यावे लागते, त्यासाठी तयारी ठेवा. अनेकदा आपल्या सुख सुविधांसह आपल्या कम्फर्ट झोनचा सुद्धा त्याग करावा लागतो.