सपाच्या आझम खान यांना झटका ! UP सरकारला द्यावी लागणार 70 हेक्टर जमीन

पोलिसनामा ऑनलाईन, लखनऊ,दि. 17 जानेवारी- समाजवादी पार्टीचे खासदार मोहम्मद आजम खान यांना आणखी एक मोठा झटका बसलाय. रामपूर एडीएम जगदंबा प्रसाद गुप्ताच्या न्यायालयाने जौहर यूनिव्हर्सिटीची 70 हेक्टर जमीन उत्तर प्रदेश सरकारच्या नावाने करण्याचा आदेश दिलाय. न्यायालयाने एमडीएमला जमीनीवर कब्जा घेणे आणि राजस्व अभिलेखात यूपी सरकारच्या नावावर जमीन करण्याचा आदेश दिलाय.

समाजवादी पार्टीचे खासदार मोहम्मद आजम खान यांच्या अध्यक्षतेखालील जौहर ट्रस्टने उत्तर प्रदेशामध्ये 2005 पासून आतापर्यंत 70.0563 हेक्टेर जमीन खरेदी केलीय. मुलायम सिंह यांच्या नेतृत्त्वातील समाजवादी पार्टीचे सरकारच्या कॅबिनेटने जौहर ट्रस्टच्या जमीन खरेदीवर स्टॅम्प ड्यूटीमध्ये सूट दिली होती. जौहर ट्रस्टने आतापर्यंत 70.0563 हेक्टर जमीन खरेदी केली. पण, यावर ट्रस्टला स्टॅम्प ड्यूटीसाठी एकही रुपया द्यावा लागला नाही.

समाजवादी पार्टी सरकारच्या कार्यकाळामध्ये जो प्रस्ताव पारित करण्यात आला होता, त्यात म्हणण्यात आलं होतं की, जौहर ट्रस्टसारख्या समाजाच्या हितासाठी कार्य करणार्‍या अल्पसंख्याक, गरीब मुलांना मोफत शिक्षण देणार्‍या संस्थांना प्रोत्साहन द्यायला हवंय.

भाजपचे लघू उद्योगाचे क्षेत्रीय संयोजन आकाश सक्सेना यांनी जौहर ट्रस्टने खरेदी केलेल्या जमिनीमध्ये शासन नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार केली होती.

रामपूर डीएमच्या आदेशाने एसडीएनने एका वर्षांपूर्वी जौहर ट्रस्टने खरेदी केलेल्या जमिनीची चौकशी केलीय. त्यात कळालं की जौहर यूनिव्हर्सिटीसाठी खरेदी केलेल्या 75.0563 जमिनीच्या व्यवहारामध्ये शासन नियमांचे उल्लंघन झालंय. यानंतर एडीएम कोर्टात खटला दाखल केला होता.

दरम्यान, सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आजम खान यांच्यावर झालेल्या कारवाईवरुन भाजपवर टीका केलीय. भाजप विरोधी पक्षातील नेत्यांना जाणूनबुजून त्रास देत आहे. आजम खान यांना खोट्या आरोपात फसवलं जातंय, असं ते म्हणाले आहेत.