वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला, शिर केले धडावेगळे

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने भयंकर हल्ला केला. या हल्ल्यात वाघाने शेतकऱ्याचे शिर धडावेगळे केले. राजेश देवीदास निमकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेमधील मंगरूळ दत्त या गावातील रहिवाशी होते. निमकर हे पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. मंगरूळ येथून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या गिरोली शेतशिवारात ही घटना घडली. हा वाघ यवतमाळ जिल्ह्यातून आल्याचे सांगण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात अनेकांचे प्राण घेणाऱ्या नरभक्षक वाघीणीनेच हा हल्ला केल्याचा संशय आहे.

शेतकरी राजेश निमकर हे पिकांना पाणी देण्यासाठी आणि चारा आणण्यासाठी सायकलवरून शेतात गेले होते. रात्री ८ वाजेपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता शेतात त्यांची सायकल आढळली. पण राजेश दिसले नाहीत. आणखी शोध घेतला असता राजेश यांचे धड आणि शिर वेगवेगळ्या ठिकाणी काही अंतरावर आढळले. घटनास्थळी पाहिल्यावर वाघानेच त्यांच्यावर हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकाराने येथील ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. राजेश यांची कौटुंबीक परिस्थिती अतिशय हलाकीची आहे. त्यातच त्यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.

देवीचे विसर्जन करताना तलावात बुडून मुलाचा मृत्यू

प्रशासनाने या नरभक्षक वाघाला पकडावे तसेच राजेश निमकर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मंगरूळपासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या गिरोली येथे गुरुवारी दुपारीच काही लोकांना वाघाच्या पायाचे ठसे दिसले होते. त्याचे फोटो काढून त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले होते. यानंतर गिरोली येथे दोन दिवसांपासून वन विभागाचे कर्मचारी ठाण मांडून बसले होते. तरीही वाघाने हल्ला केला.