भारतातील 40 वर्षांखालील सर्वात श्रीमंत व्यावसायिक, एकूण संपत्ती 24 हजार कोटी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोणताही वारसा नसताना स्वत:च्या ताकदीवर व्यवसाय उभारून
मोठी संपत्ती मिळवलेल्या तरूण उद्योजकांची यादी जाहीर झाली आहे. आयआयएफएल वेल्थ आणि हारुन इंडियाने भारतातील 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि 1 हजार कोटींपेक्षा जास्त संपत्ती असणार्‍या उद्योगपतींची ही यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिले स्थान फायन्सियल सर्व्हिस कंपनी Zerodha चे सहसंस्थापक नितीन कामत आणि निखिल कामत यांनी पटकावले आहे.

26 वर्षीय रितेश अग्रवाल सर्वात तरूण उद्योगती

या यादीत ओयो रूम्सचे संस्थापक 26 वर्षीय रितेश अग्रवाल हे सर्वात तरूण उद्योजक आहे. त्यांच्यानंतर 38 वर्षीय दिव्यांक तुरखिया यांची 14,000 कोटी आहे. तर यादीत प्रथम स्थानावर असलेल्या नितीन कामत आणि निखिल कामत यांची एकूण संपत्ती सुमारे 24 हजार कोटी आहे.

ही आहे टॉप 10 उद्योजकांची यादी

1. नितीन आणि निखिल कामत (एकूण संपत्ती 24,000 कोटी रुपये)

2. मीडिया डॉट नेटचे दिव्यांक तुरखिया (14,000 कोटी रुपये)

3. उडाणचे संस्थापक अमोद मालवीय, सुजित कुमार आणि वैभव गुप्ता (13,000 कोटी रुपये)

4. थिंक अँड लर्न्सचे रिजू रवींद्रन (7,800 कोटी रुपये)

5. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल (7,500 कोटी रुपये)

6. ओयो रूम्सचे रितेश अग्रवाल (4,500 कोटी रुपये)

एकमेव महिला उद्योजक देविता सराफ

या यादीत एकमेव महिला उद्योजक असून त्या 39 वर्षांच्या आहेत. त्यांचे नाव देविता सराफ असून त्या व्हीयू टेक्नॉलॉजीजच्या संस्थापक आहेत. त्या यादीत 16 व्या स्थानावर असून त्यांची संपत्ती सुमारे 1200 कोटी आहे.

बंगळुरुतील 9 उद्योजक

बंगळुरूच्या उद्योजकांची या यादीवर छाप आहे. कारण यादीत बंगळुरूतील तब्बल 9 उद्योजकांनी स्थान मिळवले आहे. तर गुरुग्राम आणि दिल्लीती 2-2 उद्योजक असून देशाबाहेर राहून व्यवसाय करणारे 2 उद्योजकही यादीत आहेत.

274 टक्क्यांनी वाढली संपत्ती

आयआयएफएल वेल्थ आणि हारुन इंडियाच्या या यादीतील दुसर्‍या क्रमांकावरील 38 वर्षीय तुरखिया 2016 मध्ये बिलिनिअर बनले होते, त्यावेळी त्यांची कंपनी Media.net 1 अब्ज डॉलर्समध्ये विकली होती. तर तिसर्‍या स्थानी असलेल्या उडाणचे संस्थापक अमोद मालवीय, सुजित कुमार आणि वैभव गुप्ता यांची संपत्ती सुमारे 274 टक्क्यांनी वाढली आहे.