श्रीमंतांच्या यादीतही महाराष्ट्र ‘अव्वल’ ! देशातील 10 श्रीमंतांमध्ये राज्यातील 7 जणांचा समावेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    मंगळवारी (29 सप्टेंबर 2020) आयआयएफएल वेल्थ हुरून इंडियाच्या 2020 सालातील धनाड्यांची सूची असलेला अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यात भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या सांपत्तिक स्थितीला कोरोनाग्रस्त खंगलेल्या अर्थव्यवस्थेची कोणतीही बाधा झाली नाही. उलट मार्चपासून लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात त्यांनी तासाला 90 कोटी रुपये या प्रमाणे कमाई केल्याचं स्पष्ट झालं आहे. केवळ अंबानीच नाही तर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत किती वाढ आणि घट झाली यासंदर्भातही सविस्तर माहिती या अहवालात आहे. खास बात अशी की, या अव्वल 10 श्रीमंतांपैकी 7 जण हे महाराष्ट्रात राहणारे असल्याचं स्पष्ट झालं आहे.

1)  भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 10 व्या स्थानी आहेत शापूरजी पालनजी मिस्त्री. यांची संपत्ती लॉकडाऊनच्या काळात एक टक्क्यानं कमी झाली. या यादीत त्यांचा नंबरही एका स्थानानं घसरला आहे. त्यांची एकूण संपत्ती 76 हजार कोटी एवढी आहे. शापूरजी पालनजी कंपनीचे 55 वर्षीय मालक हे मोनॅको देशात राहतात असं या अहवालात सांगितलं आहे.

2)  या यादीत नवव्या स्थानावर शापूरजी पालनजी कंपनीचेच सायरस मिस्त्री आहेत. शापूरजींप्रमाणे त्यांचीही संपत्ती ही एक टक्क्यानं कमी झाली आहे. 52 वर्षीय सायरस हे सध्या महाराष्ट्रात राहतात. त्यांची एकूण संपत्ती ही 76 हजार कोटी एवढी आहे. मागील यादीत आठव्या स्थानी असणारे सायरस यंदा नवव्या स्थानी आहेत.

3)  सन फार्मास्युटीकल्स इंडस्ट्रीजचे दिलीप सांघवी यांनी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 2 स्थानांनी उडी घेत आठवं स्थान मिळवलं आहे. 64 वर्षीय दिलीप हे महाराष्ट्रात राहतात आणि त्यांची एकूण संपत्ती 17 टक्क्यांनी वाढली आहे. सांघवी यांची एकूण संपत्ती 84 हजार कोटी एवढी आहे.

4)  संपत्ती कमी झालेल्यांमध्ये आणखीन एक नाव म्हणजे कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष उदय कोटक आहे. त्यांची संपत्ती 8 टक्क्यांनी कमी झाली आहे. या यादीत मागील वर्षी ते सातव्या क्रमांकावर होते. यंदा ते आठव्या स्थानावर आहेत. 61 वर्षीय कोटक यांची एकूण संपत्ती 87 हजार कोटी एवढी आहे. कोटक हे महाराष्ट्रातच राहतात.

5)  सर्वाधिक नफा झालेलेंच्या यादीत डीमार्टचे राधाकिशन दमानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अंबानींनंतर दमानी यांनाच लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त फायदा झाला आहे. दमानी यांच्या संपत्तीत 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दमानी यांनी या यादीत 13 व्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. दमानी यांची एकूण संपत्ती 87 हजार 200 कोटी एवढी आहे. 65 वर्षीय दमानी हे सध्या महाराष्ट्रातच राहतात.

6)  पुण्यातील सायरस पुनावाला हे श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या स्थानावर आहेत. 1966 साली सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाची स्थापना करणाऱ्या पुनावाला याची एकूण संपत्ती 94300 कोटी एवढी आहे. त्यांच्या संपत्तीत एकूण 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सायरस पुनावाला हे 79 वर्षांचे आहेत. कोरोनावरील लस बनवण्यासंदर्भातील कामात सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचा महत्त्वाचा सहभाग आहे.

7)  अझीम प्रेमजी हे श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 5 व्या स्थानी आहेत. विप्रोचे सर्वेसर्वा असणारे अझीम प्रेमजी हे मागील वेळेस या यादीत तिसऱ्या स्थानी होते. प्रेमजी यांच्या संपत्तीत 2 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती 1 लाख 14 हजार कोटी एवढी आहे. 75 वर्षीय अझीम प्रेमजी हे कर्नाटकमध्ये राहतात. एप्रिल महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विप्रो लिमिटेड, विप्रो एन्टरप्रायजेस लिमिटेड आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशननं 1125 कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला.

8)  कोरोना कालावधीत सर्वाधिक नफा झालेल्या व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी हे तिसऱ्या स्थानावर आहेत तर श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. अदानी यांची संपत्ती 48 टक्क्यांनी वाढली आहे. 58 वर्षीय गौमत अदानी यांची एकूण संपत्ती 1 लाख 40 हजार 200 कोटी एवढी आहे. अदानी हे गुजरातमध्ये रहातात. मागील वेळेस ते या यादीत 6 व्या स्थानावर होते.

9)  एचसीएल टेकचे शिव नाडार यांच्या धनवैभवात 34 टक्के वाढ झाली आहे. दिल्लीत राहणारे नाडार श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. नाडार यांची एकूण संपत्ती 1 लाख 41 हजार 700 कोटी एवढी आहे. तिसऱ्या स्थानी असणारे नाडार हे मागील वेळेस पाचव्या स्थानावर होते. नाडार हे 75 वर्षांचे आहेत.

10)  वैभवाला गळती लागलेलेंच्या यादीत हिंदुजा बंधू अव्वल स्थानी असले तरी ते श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. एकूण संपत्तीत 23 टक्के घसरण झाल्यानंतरही हिंदुजा बंधूंची संपत्ती 1 लाख 43 हजार 700 कोटी एवढी आहे. हिंदुजा बंधू हे महाराष्ट्र, युके आणि स्वित्झर्लंडमध्ये राहतात.

11) भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानावर आहेत. त्यांची वैयक्तीक संपत्ती ही 2,77,700 कोटी रुपयांवरून 6,58,400 कोटी रुपयांवर गेली आहे. ते सलग नवव्या वर्षी हुरून इंडिया यादीतील सर्वात श्रीमंत भारतीय म्हणून अव्वल स्थान सांभाळून आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज या भारतातील सर्वात मौल्यवान कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष असलेले अंबानी हे जगातील चौथ्या क्रमांकाचे व्यक्ती आहेत. त्यांनी टेस्लाचे इलॉन मस्क आणि अल्फाबेटचे सहसंस्थापक सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांनाही पिछाडीवर टाकलं आहे.

हुरूनच्या मते जागतिक धनाढ्यांच्या अव्वल पाचमध्ये स्थान मिळवणारे अंबानी हे एकमेव भारतीय आहेत. उल्लेखनीय बाब अशी की, या जागतिक यादीत अंबानी यांचे धनवैभव हे क्रमवारीत त्यांच्यानंतर असलेल्या 5 धनाढ्यांच्या एकत्रित संपत्तीइतके आहे.

इथं पहा देशातील 10 श्रीमंत व्यक्तींची यादी –