चांगली बातमी : आता फक्त 399 रूपयांमध्ये करा ‘कोरोना’ची टेस्ट, केवळ दीड तासात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनावरील लस तयार करण्यासोबत त्याची किट तयार करण्याचेही काम सुरुच आहे. आता आयआयटी दिल्लीने आरटी पीसीआर तंत्रज्ञानयुक्त किट तयार केली असून ही किट ३९९ रुपयात उपलब्ध होईल. तसेच ती सर्वसामान्यांना परवडणारी आहे. ही ३९९ रुपये किंमत असलेली किट अवघ्या दीड तासात निकाल देईल. या किटच्या निर्मितीसाठी सहा कंपन्यांना परवाना देण्यात आला आहे. एका कंपनीने हे उत्पादन तयार देखील केले असून ते बुधवारी लाँच करण्यात आले.

या किटचे नाव कोरोशुअर (Corosure) असे आहे. या किटद्वारे तपासणी करण्यास लवकरच सुरुवात केली जाईल. या किटमध्ये आरटी पीसीआर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून ही किट अत्यंत कमी वेळेत निकाल देते. या किटमुळे रुग्णावर वेळेवर उपचार करण्यास मदत होईल. बुधवारी मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते ही किट लाँच करण्यात आली. दरम्यान त्यांनी या किटबाबत माहितीही दिली. एका महिन्यात तब्बल २० लाख किट तयार करता येतात.

ही किट बाजारात येण्यास तीन महिने लागणार आहेत. आयआयटी दिल्लीच्या कुसुमा स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सच्या १० जणांच्या समूहाने ही किट तयार केली असून प्रोबलेस किट हे या किटचे वैशिष्ट्य आहे. या तपासणी पद्धतीत प्रोबची आवश्यकता नसल्याने किटमध्ये प्रोब ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळेच हे किट स्वस्त आहे.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून त्याचा चाचणी खर्च अनेकांना परवडत नाही. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चाचणी मूल्य कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. पण आता कोरोशुअर सारख्या स्वस्त किटमुळे अनेकांना कोरोना चाचणी करण्यास मदत होईल.