बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी कोल्हापुरातील १५ हॉस्पिटलवर छापे

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन – अल्पवयीन मुलींच्या बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास समितीच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूरमधील १५ हॉस्पिटलवर छापे टाकले आहेत. केंद्राच्या या छापेमारीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलींच्या बेकायदेशीर गर्भपाताच्या संशयावरून या विशेष पथकाने ही छापेमारी केली आहे. कागल येथील गंगा हॉस्पिटलवरील कारवाईत संशयास्पद माहिती समोर आल्याचे केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाचे सदस्य शिवानंद डंबळ यांनी सांगितले.
अल्पवयीन मुलींच्या बेकायदेशीर गर्भपाताचे प्रकार घडत असल्याच्या संशयावरून सकाळपासून केंद्र सरकारच्या महिला व बालविकास विभागातील अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास अधिकारी यांच्या विशेष पथकाने छापे टाकले. यामध्ये कागल येथील गंगा हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलीचा गर्भपात झाल्याच्या संशयावरून चौकशी करण्यात आली. हॉस्पिटलमधील कागदपत्रांची तपासणी करून १८ वर्षांखालील प्रसूती झालेल्या घटनेचे स्पष्टीकरण पथकाने मागवले आहे. पुनर्तपासणीत दोषी आढळल्यास अल्पवयीन प्रसूती झालेल्या महिलेच्या कुटुंबियांवर पॉस्को कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच छाप्यात जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केले जात आहेत का, तसेच महिलेचे वय, तिचे आधार कार्ड, तिची जन्मतारीख यांची नोंद हॉस्पिटल्समध्ये करण्यात येत आहे का, याची तपासणी करण्यात आली. केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाचे सदस्य शिवानंद डंबळ यांनी या छापेमारीबाबत सांगितले की, जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात तसेच अनधिकृत कामे होत असल्याचा संशय आहे. त्यानुसार विविध हॉस्पिटलवर कारवाई केली जात आहे. संशयास्पद हॉस्पिटलमधील कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

बेकायदेशीर गर्भपाताच्या घटना वाढत असल्याच्या संशयावरून केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास समितीच्या अधिकाऱ्यांनी सहा महिन्यांपूर्वी इचलकरंजी येथील डॉ. अरुण पाटील यांच्या दवाखान्यावर छापा टाकून कारवाई केली होती. त्यानंतर आता पुृन्हा एकदा अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.