अबब ! 3 वर्षात जमवली कोट्यावधींची ‘माया’, 2 हजाराच्या लाचप्रकरणातून RTO अधिकाऱ्याचा ‘प्रताप’ उघड

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  शासनाच्या विविध विभागापैकी आरटीओ म्हणजेच प्रादेशिक परिवहन विभाग हा सर्वात भ्रष्ट विभाग समजला जातो. वाढती वाहनसंख्या, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि किचकट, लोकांच्या दृष्टीने त्रासदायक नियम यामुळे आरटीओमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्याचे सर्वच जण सांगतात. पण, हा भ्रष्टाचार किती असावा, याची गणती आजवर झाली नव्हती.

नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या एका सापळा कारवाईतून ही माहिती काही प्रमाणात पुढे आली आहे. आरटीओमध्ये लागलेल्या एका अधिकाऱ्यांने केवळ ३ वर्षात तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांची बेकायदा माया जमवली असल्याचे उघड झाले आहे. मिथुन रामेश्वर डोंगरे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. केवळ २ हजार रुपयांच्या लाचच्या प्रकरणातून हे उघड झाले आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यातून ही माहिती पुढे आली आहे. एखादा अधिकारी ३ वर्षात जर किमान पावणे सव्वा कोटी रुपये कमाऊ शकत असेल तर इतकी वर्षे सेवा केलेल्यांनी किती माया जमविली असेल, याचा हिशोब करायला लागला तर तुमचे डोके गरगरायला लागेल.

मिथुन डोंगरे हा सापडला तो केवळ २ हजार रुपयांची लाच घेताना. त्यातून हे प्रकरण पुढे वाढत गेले.
नागपूरमध्ये कार्यरत असताना वाहन परवाना देण्यासाठी मिथुन डोंगर यांनी दलाल मुकेश रामेटेके याच्या मदतीने २ हजार रुपयांची लाच घेतली होती. या प्रकरणी २४ एप्रिल २०१८ रोजी त्याला अटक केली गेली. दोघांविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापाठोपाठ डोंगर याच्या निवासस्थानी एसीबीच्या पथकाने झडती घेतली.

त्यात त्यांना १ कोटी ७१ लाख रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रे सापडली. डोंगरे याने ३ वर्षाच्या काळात जेथे काम केले होते. त्याविभागाकडून एसीबीने माहिती मागविली. त्याचे उत्पन्नांचे स्त्रोत आणि त्याच्याकडे असलेली संपत्ती याचा तपास केल्यावर केवळ ३ वर्षात त्याने १ कोटी २२ लाचख २५ हजार ६४१ रुपयांची बेकायदा संपत्ती जमविल्याचे उघड झाले आहे.

आरटीओतील शिकाऊ वाहन परवाना घोटाळा उघडकीस आला होता. त्यातही मिथुन डोंगरे याचे नाव आले होते. सप्टेंबरमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने डोंगरे याच्यासह १७ आरटीओ अधिकारी आणि दलालांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/