काय सांगता ! होय, मेडिकल स्टोअरमध्ये सुरू होतं चक्क क्रिकेट ‘बेटिंग’, पोलिसांकडून ‘पर्दाफाश’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – मेडिकलमध्ये जिथे औषधे मिळतात, तेथे क्रिकेट सट्ट्याचा डाव रंगला होता. घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे एका मेडिकलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडत होता. विशेष कृती दलाच्या पथकाने या मेडिकलवर धाड टाकून एकाला अटक केली. या मेडिकलमधून पोलिसांनी 47,800 रुपये रोख, मोबाइल, जुगार साहित्य असा एकूण 57 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार रांजणीत 20 – 20 इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळला जात असल्याची गुप्त माहिती विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आनम मेडिकलवर धाड टाकली. पोलिसांनी अख्तर अली सैय्यद अली यास सट्टा खेळताना रंगेहाथ अटक केली.

अख्तरकडून पोलिसांनी 47,800 रुपयांसह मोबाइल, जुगार साहित्य असा 57 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान अख्तर अली याने रोहित सेठ (चिंतामणी ट्रॅव्हल्स, जालना) आणि दिपक सेठ (सेलू) यांच्या सांगण्यावरुन सट्टा घेत असल्याची कबुली दिली आहे, आता पोलीस पुढील तपास करत आहेत.