शिरूर आणि परिसरात अवैध प्रवासी वाहतूक ‘तेजीत’

पुणे (शिरुर) : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर शहर व परिसरात पोलीसांच्या आशिर्वादाने बेकायदा अवैध प्रवासी वाहतूक जोरात सुरू असुन या शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रवासी वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. अवैध प्रवासी वाहतूकीला अभय दिल्याने शिरुर पोलीस ठाण्याच्या वाहतूक पोलीसांना मोठी आर्थिक कमाई होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
Shirur
शिरुर शहरातून पारनेर, श्रीगोंदा, शिरुर या तालुक्यात बेकायदा प्रवासी वाहतूक पोलीसांच्या आशिर्वादाने होत आहे. ठरलेल्या हिशोबानुसार त्या त्या मार्गावरील वाहन चालकाकडून वाहतूक पोलीस हप्ते वसुल करत आहेत. वाहतूक पोलिसांच्या कृपादृष्टीमुळे या भागामध्ये बेकायदा प्रवासी वाहतूक सुरु असल्याची चर्चा आहे. वाहतूक पोलिसांच्या सहकार्यामुळे प्रवासी वाहतूक करणाचे वाहन चालक एसटी बसस्थानकासमोर वाहने उभे करून प्रवासी वाहतूक करत आहेत. बसस्थानकासमोर वाहने लावून रस्ता अडवला जात असून या वाहन चालकांना पोलिसांचे अभय असल्याने ते बिनधास्तपणे वाहने लावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

एसटी बसस्थानकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात तर अक्षरशः अवैध वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या विळख्यात दिसत असुन येथे उभे राहणाऱ्या बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याने जाणाऱ्या नागरीकांना अवघड झाले आहे. याच प्रमाणे गाडीतळ या ठिकाणी शहरातील जुन्या पुणे नगर मार्गावर रस्त्यावर ही बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी वाहने प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे एसटी बसस्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या एसटीला अडथळा होऊन प्रसंगी मोठी वाहतूक कोंडी होते.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस कमाई करण्यात व्यस्त असतात. वाहतूक पोलिसांचे दुर्लक्षामुळे शहरातील वाहतूक कोंडी नियमित होत असल्याचे दृश्य नागरिकांना पहावयास मिळत आहे. पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून शहरात होणारी वाहतूक कोंडी दुर करावी अशी मागणी नागरीकांतुन होत आहे.

Visit : Policenama.com