पार्थ पवारांचे ट्रोलर्सना उत्तर : बोलण्यापेक्षा माझा काम करण्यावर जास्त भर 

मावळ ( पुणे ) : पोलीसनामा ऑनलाईन – मावळमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर सर्वांचे लक्ष त्यांच्या पहिल्या भाषणावर होते. चिंचवडमध्ये पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित रविवारी फोडण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी पार्थ पवार यांनी भाषण केले. त्यांच्या या भाषणावरून विरोधकांनी खिल्ली उडवत त्यांच्यावर टीका केली होती. विरोधकांच्या या टीकेवर पार्थ पवारांनी उत्तर दिले आहे. आज वडगाव यथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच उत्तर दिले.

माझं ते पहिलं भाषण होतं, एक-दोन चुका झाल्या. मात्र, याचा अर्थ असा नाही की त्यावरच मी लक्ष केंद्रीत करायला हवं. काही लोक चांगली भाषणं करतात मात्र, काम करीत नाहीत. माझी काम करण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो, अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

दरम्यान, पार्थ पवारांनी आपल्या कारकिर्दितील पहिलं भाषण होते. यावेळी सभेत मोठ्याप्रमाणात गर्दी जमली होती. तर राजकारणातील चाणाक्य मानले जाणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि पार्थ पवारांचे आजोबा शरद पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते. तसंच त्यासोबत अनेक दिग्गज मंडळीही व्यासपीठावर उपस्थित होती. त्यावेळी पार्थ यांनी केलेल्या भाषणात ते दोन ते तीन वेळा अडकले. शिवाय भाषण सुरु करताना माझं पहिलं भाषण आहे, ते ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यासमोर त्यामुळं काही चुकलं तर सांभाळून घ्या, अशी विनंती केली होती.