‘मी गोस्वामीला भेटण्यासाठी निघालोय, हिंमत असेल तर रोखून दाखवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मी अर्णब गोस्वामींना( arnab-goswami) भेटण्यासाठी तळोजा कारागृहाकडे taloja-jail)निघालो आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हान भाजप आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांनी पोलीस आणि राज्य सरकारला दिले आहे.

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात ( Anvay Naik Suicide Case) रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि भाजपचे नेते सध्या आमने-सामने आले आहेत. गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भाजपकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे. त्यात पुन्हा आ. कदम यांनी ट्विट करून आघाडी सरकारला आव्हान दिले आहे.

गोस्वामीच्या अटकेविरोधात एक दिवसाचे उपोषण आणि सिद्धिविनायक मंदिरापर्यंत चालत आंदोलन केल्यानंतर आ. कदम यांनी आज थेट अर्णब गोस्वामींची भेट घेण्यासाठी तळोजा कारागृहाच्या दिशेने कूच केली आहे. दरम्यान, तळोजाला निघण्यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये कदम म्हणाले की, गोस्वामी यांच्या जीविताला धोका आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर त्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची असेल. मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना देशातील जनता कधीही माफ करणार नाही. तुम्ही जबरदस्तीने आणीबाणी लादली आहे. आता मी गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहाकडे निघालो आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हानच कदम यांनी राज्य सरकारला दिले आहे.

गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी
अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार गोस्वामी यांची रविवारी अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली.