शेतकरी आंदोलन प्रश्नांवर रावसाहेब दानवेंनी काढला ‘पळ’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – “मी बनावट नव्हे, हाडाचा शेतकरी आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला,” असे म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनावरुन केलेल्या वादग्रस्त विधानावर पांघरुण टाकण्याचा प्रयत्न केला. ते औरंगाबाद येथे मंगळवारी (१५) वार्तालापमध्ये बोलत होते.

तीन नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्हात बोलताना एका धक्कादायक विधान केले होते. त्यांनी म्हटलं की, “आता जे आंदोलन सुरु आहे ते शेतकऱ्यांचे आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. मुस्लिम समाजाला भडकवून सीएए, एनआरसीमुळे मुस्लिमांना देशाबाहेर जावं लागेल असं सांगितलं गेलं. मात्र, एखादा तरी मुस्लिम नागरिक बाहेर का?,” असे सांगत नव्या वादाला तोंड फोडले होते. त्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका करण्यात आली होती.

दरम्यान, शेतकरी कायद्यावर आज औरंगाबाद येथे वार्तालाप आयोजित करण्यात आले होते. . तेव्हा दानवे यांनी नव्या कृषी कायद्याची माहिती दिली. नंतर सर्व वार्ताहरांना प्रश्न विचारायला सांगितले. त्यावेळी वार्ताहरांनी शेतकरी आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा हात कसा, असा सवाल विचारला असता, ते म्हणाले, प्रसारमाध्यमांमध्ये माझ्या विधानाचा विपर्यास झाला. मी बनावट नव्हे, हाडाचा शेतकरी आहे एवढेच म्हणत त्यांनी वार्तालापातून काढता पाय घेतला. वार्ताहरांनी नेमका नेमका विपर्यास काय झाला ते तरी सांगा, असे प्रश्न उपस्थित केला असता मात्र दानवे न थांबता निघून गेले.