‘मी काही ट्रम्प नाही’ ! उद्धव ठाकरेंच्या रोखठोक मुलाखतीचा प्रोमो रिलीज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच मॅरेथॉन मुलाखत घेतली. शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत लवकरच पहाण्यास मिळणार आहे. ‘लॉकडाऊन आहेच, एक एक गोष्ट आपण सोडवत चाललो आहे, मी काही ट्रम्प नाही, जी आपली माणसं तडफडताना पाहू शकेल’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या परिस्थितीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला प्रोमो आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. येत्या 25 आणि 26 जुलै रोजी दोन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीमध्ये कोरोना आणि ठाकरे सरकारच्या सहा महिन्यांच्या कारभारावर विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्याचीच काही झलक प्रमोमध्ये दाखवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनवर आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मी टीकेची परवा करत नाही, त्यामुळे काही निर्णय घ्यायचे असेल तर घ्यावेच लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत अशी माझीही भूमिका आहे, पण राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता त्या न घेतलेल्या बऱ्या, असे उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीतून स्पष्ट केलं.