‘तुमची सायकल घेऊन जातोय, मला माफ करा’, मजुराची चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था: लॉकडाऊनमध्ये काम नसणे, पैसे- रेशन नसणे आणि राहण्याचा ठिकाणा नसल्याने कामगार घरी जात आहेत. सरकारकडून पूर्ण बंदोबस्त न होऊ शकल्यामुळे घरी जाण्यासाठी कामगार ‘स्वावलंबी’ होत आहेत. घरी जाण्यासाठी जो कोणता सहारा मिळत आहे, त्याचा उपयोग करीत ते घरी जात आहेत. घरी जाणाऱ्या मजुरांचे अनेक प्रकारचे फोटो समोर आले आहेत. त्यात पायी चालत जाणारे कामगार, ट्रक, रिक्षा, बैलगाड्या, हातगाडी आणि सायकलींच्या मदतीने जाणारे कामगार दिसून येत आहेत.

राजस्थानमधील भरतपूर येथून एक बातमी समोर आली आहे. येथे उत्तर प्रदेशमधील एक मजुर घरी जाण्यासाठी कथितपणे सायकल चोरी करून घेऊन गेला. असे सांगितले जात आहे की, त्यांनी सायकल मालकासाठी एक पत्रही सोडले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

काय आहे पत्र?

नमस्ते जी,

मी तुमची सायकल घेऊन जात आहे. कृपया शक्य असल्यास मला माफ करा. कारण माझ्याकडे साधन नाही मला एक मूल आहे मला त्याच्यासाठी ते करावे लागले. कारण तो अपंग आहे. चालू शकत नाही आम्हाला बरेलीपर्यंत जायचे आहे.

तुमचा दोषी
एक प्रवासी
मजूर आणि मजबूर
मोहम्मद इकबाल खान
बरेली

मिळालेल्या माहितीनुसार चोरी झालेल्या सायकलच्या मालकाचे नाव साहिब सिंग आहे. सायकल चोरीची घटना सहानावली गावातील 13 मेच्या रात्रीची आहे. हे गाव भरतपूर-आग्रा महामार्गावर पडते आणि सीमेजवळ आहे.

सकाळी उठल्यावर घराबाहेर सायकल नसल्याचे घरातील सदस्यांनी सांगितले. आजूबाजूला पाहिले पण समजले नाही. सायकल चोरी होण्याची शक्यता होती. दरम्यान, झाडू मारत असताना एक कागद सापडला. त्यावर काहीतरी लिहिले होते. वाचल्यानंतर कळाले मजुराने घरी जाण्यासाठी सायकल नेली आहे.

रात्री साडेचारच्या सुमारास सायकल चोरी झाल्याचे सायकल मालक साहिब सिंग यांचे मोठे बंधू प्रभू दयाल यांनी सांगितले. घरातले लोक आत होते आणि सायकल बाहेर उभी होती. हे काम गावातीलच कोणाचे आहे. यात बाहेरील व्यक्तीचा सहभाग नाही. आसपासच्या कुणीतरी सायकल घेतली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी सायकल चोरीची तक्रार पोलिसात नोंदविण्याचा विचारही केला होता. पण पत्र वाचल्यानंतर आम्ही कोणतीही तक्रार केली नाही. तसेही सायकल फार जुनी होती.