मोठी बातमी : ‘खासगी’ डॉक्टरांचा आज देशव्यापी ‘संप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी २४ तासांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपाला मार्ड, परिचारिका संघटना, रेडिओलॉजी असोसिएशननेही पाठिंबा दिला आहे. तसेच या संपाला सरकारी रुग्णालयातील डॉक्टर काळ्या फिती लावून संपाला पाठिंबा देणार आहेत. डॉक्टरांवर सतत होणारे जीवघेणे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा तयार करण्यात यावा. डॉक्टरांना सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी, अशी मागणी आयएमएने केली आहे.

आज सोमवारी सकाळी सहा वाजता या संपाला सुरुवात झाली असून सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा असे २४ तास ओपीडीसह वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत. मार्ड संघटनेचा या संपाला पाठिंबा असला तरीही सरकारी रुग्णालयांमध्ये कोणत्याही प्रकारे वैद्यकीय सेवा बंद राहणार नाही. देशभरातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी तसेच रुग्णालयांसाठी सर्वसमावेशक असा केंद्रीय कायदा बनवावा. सुरक्षा मापदंड आणि मारहाणीबाबत सरकारने गंभीर राहून त्यावर कार्यवाही करावी, केंद्रीय कायद्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात आयपीसी अंतर्गत कठोर कायद्याची तरतूद करावी, अशी मागणी मागणी ‘आयएमए’ने केली.

प. बंगालमधील डॉक्टर चर्चेस तयार –

पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी ममता बॅनर्जी यांच्याबरोबर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी बैठकीची वेळ आणि ठिकाण ठरवावे मात्र या बैठकीला प्रसारमाध्यमांना, पत्रकारांनाही बोलवावे. बंद दाराआड कोणतीही चर्चा होणार नाही. असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.