अलर्ट ! महाराष्ट्र अन् गुजरातवर ‘हिका’ वादळाच्या धोक्याचं सावट, ‘सायक्लोन मॅन’नं दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : कोरोना संकटाला तोंड देत असलेल्या गुजरातवर आता चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी अरबी समुद्रासाठी दुहेरी दबाच्या पट्ट्याचा अलर्ट जारी केला आहे. भारतात सायक्लॉन मॅन म्हणून प्रसिद्ध, चक्रीवादळाच्या अंदाजाचे तज्ज्ञ मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटले की, दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीपमध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, आम्हाला वाटते की सोमवारी तो डिप्रेशनमध्ये परावर्तीत होईल आणि परवा तो चक्रीवादळात रूपांतरित होईल. तर 3 जूनच्या सायंकाळीपर्यंत हे वादळ गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनार्‍यांपर्यंत पोहचेल. या वादळाचे नाव ’हिका’ आहे, त्याचे नामकरण मालदीवने केले आहे.

अरबी समुद्रात सक्रिय 2 वादळं

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी एका खासगी एजन्सीने चक्रीवादळाची शक्यता वर्तवली होती, परंतु हवामान विभागाकडून याबाबत काहीही सांगण्यात आले नव्हते. अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन सिस्टम वेस्ट सेंट्रल आणि साऊथ वेस्टवर तयार होत आहे, जी 48 तासानंतर डिप्रेशनमध्ये बदलू शकते आणि चक्रिवादळाचे रूप धारण करू शकते आणि असे झाले तर सौराष्ट्र आणि साऊथ गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळू शकतो.

अ‍ॅडव्हायजरी जारी

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अगोदरच अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे आणि म्हटले आहे की, दक्षिण गुजरात, मध्यगुजरात आणि सौराष्ट्रात जोरदार वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, यासाठी लोकांना अलर्ट करण्यात आले आहे.

एक नव्हे, दोन वादळांचा धोका

आयएमडीने म्हटले की, गुजरातवर एक नव्हे, तर दोन वादळांचे संकट घोंघावत आहे. विभागानुसार पहिले वादळ 3 जून आणि दुसरे वादळ 6 जून रोजी येण्याची शक्यता आहे. पहिल्या वादळाचा वेग सुमारे 110 किमी प्रति तास असेल, जे सौराष्ट्र , पोरबंदर, जूनागढ़, अमरेली, राजकोट आणि भावनगर जिल्ह्यांना प्रभावित करेल. तर 6 जूनचे वादळ गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांना प्रभावित करेल.

कशी तयार होतात चक्रीवादळं?

पृथ्वीच्या वायुमंडळात हवा असते, समुद्राच्या वर सुद्धा जमीनीप्रमाणे हवा असते, हवा नेहमी उच्चदाबाकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे वाहत असते. जेव्हा हवा गरम होते तेव्हा ती हलकी होते आणि वर जाऊ लागते, जेव्हा समुद्राचे पाणी गरम होते, तेव्हा त्याच्यावरील हवा गरम होते आणि वर जाऊ लागते. याठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होऊ लागतो, आजूबाजूची थंड हवा या कमी दाबाच्या पट्ट्याला भरण्यासाठी या क्षेत्राकडे वेगाने सरकू लागते. परंतु पृथ्वी आपल्या आसाभावेती फिरत असल्याने ही हवा सरळ दिशेत न येता वळून गोल फिरू लागते आणि त्या जागेवरून पुढे जाऊ लागते, यास चक्रीवादळ म्हणतात.