सावधान ! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील काही जिल्ह्यात 10 ते 13 ऑगस्ट मुसळधार पवासाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ आणि किनारपट्टीजवळच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असेल आणि मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी बरसतील असेही सांगितले आहे.

चार दिवसांपुर्वी झालेल्या मुसळधार पवासामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसाने तर पूरस्थिती निर्माण होते की काय? असा प्रश्न समोर उभा होता. मात्र पावसाचा जोर दोन दिवस ओसरल्याने स्थिती पूर्ववत होण्यास मदत झाली. आता पुन्हा एकदा 10 ते 13 ऑगस्ट विदर्भ आणि कोकणात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

किनारपट्टीजवळच्या भागांमध्ये पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. 5 ऑगस्टला झालेल्या पावसानं मुंबईसह उपनगरांमध्ये नागरिकांची दाणादाण उडाली. अनेक घरांमध्येही पाणी शिरले होते. तर राज्यातील अनेक नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. मात्र पुन्हा तीन दिवस पावसाने दांडी मारल्यानं स्थिती नियंत्रणात आली. आता पुन्हा एकदा पुढचे तीन दिवस राज्यात विदर्भ आणि कोकणात अलर्ट जारी करण्यात आला आहे.