पुरग्रस्तांना तातडीने सानुग्रह अनुदानाची मदत : पालकमंत्री प्रा. राम शिंदे

पुरग्रस्त भागाची पाहणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – कोपरगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील पुरग्रस्त कुटुंबाची घरे, शेती यांचे तत्काळ पंचनामे करुन तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. शासन व प्रशासन पुरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे पण वस्त्रोदयोग तथा पालकमंत्री प्रा. राम‍ शिंदे यांनी आज कोपरगाव येथे सांगितले.

कोपरगाव तालुक्यातील डाऊच बु, हिंगणी व कोपरगांव शहरी भागातील पुरग्रस्तांच्या पाहणीवेळी ते बोलत होते. यावेळी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी पंडित वाघीरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव ,डाऊचच्या सरपंच पुष्पाताई माळी, उपसरपंच सुनिताताई ढमाले, हिंगणीचे सरपंच दत्ता पवार, संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन संजय होन आदी यावेळी उपस्थित होते.

प्रा. शिंदे यावेळी म्हणाले की, कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात 18 गावातील, 251 कुंटुंबातील 1,162 लोकसंख्या तसेच शहरी भागातील 12 ठिकाणावरील 108 कुंटुंबातील 540 लोकसंख्या अशा एकुण 1,702 लोकसंख्या असणाऱ्या पुरग्रस्तांना शासन, प्रशासन व संजीवनी उदयोग समुहाच्यावतीने सर्व आवश्यक त्या सर्वसोयी सुविधा देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. ज्या पुरगस्त शेतकऱ्यांची शेती, घरे व संसारपयोगी वस्तू यांचे तातडीने पंचनामे करुन तत्काळ सानुग्रह अनुदान पुरग्रस्तांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. याबाबतच्या सर्व सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

गोकुळनगरी पुलाला 35 लाख मंजूर
गोदावरी तीरावरील कुंटुबांना वारंवार पूर परिस्थितीसारख्या नैसर्गिक घटनांना सामोरे जावे लागते. गोदाकाठारील कुंटुबाचे जनजीवन भविष्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली तरी दैनंदिन जनजीवन विस्कळीत होणार नाही. यासाठी शासन स्तरावरुन योग्य त्या कायमस्वरुपाच्या उपाययोजना राबवून ग्रामीण व शहरी भागातील प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगतानाच पालकमंत्री श्री. शिंदे यांनी शहरातील गोकुळनगरी या पुलाला 35 लाख रुपये मंजूर करण्यात आहे आहेत. तसेच भविष्यातील पुरपरिस्थितीदरम्यान शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. तसेच लक्ष्मीनगर भागातील अतिक्रमण झालेल्या घरांचाही प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचेही ते म्हणाले.

रस्ते व पुलाचा प्रश्न लवकर मार्गी लावू
पुरासारखी येणारी नैसर्गिक आपत्ती ही वांरवार येणारी आपत्ती आहे. कोपरगांव तालुक्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीला शासन, प्रशासन व संजीवनी उदयोग समुहाने आपत्कालीन व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने राबवून नैसर्गिक संकटाचा सामना यशस्वी केल्याबाबत सर्वांचे कौतुक करुन, आपत्कालीन परिस्थितीत शासन स्तरावरुन निधी कमी पडु दिला जाणार नाही तसेच शासन व प्रशासन सर्वोतोपरी मदत करेल तसेच डाऊच बु येथील रस्ते व पुलाचा प्रश्नही लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचेही शेवटी शिंदे यांनी सांगितले.

पूरग्रस्तांसोबत घेतला अल्पोहार
पूरग्रस्त भागाची पाहणी दरम्यान डाऊच ब्रु, येथे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पुरग्रस्त कुंटुंब यांच्यासोबत अल्पोहार घेऊन पुरग्रस्त व डाऊच ग्रामस्थ यांच्या अडीअडचणीबाबत चर्चा केली.

आरोग्यविषयक वृत्त –