एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या पालिका अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करा

पोलिसनामा ऑनलाइन – जे पालिका अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात आहेत. तसंच वर्षानुवर्षे एकाच जागी खुर्चीला चिटकून बसले आहेत. अशा अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदल्या कराव्यात अशा मागणी पत्र मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख (Guardian Minister Aslam Sheikh) यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांंकडे सुपूर्त केलं आहे.

“ठरावीक कालावधीनंतर बदली करण्याचा नियम असताना बदलीपात्र असूनही महानगरपालिकेतील पदाधिकारी व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेने काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. हे चित्र मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणाऱ्या महानगरपालिकेत सर्रास पहायला मिळते”, असं अस्लम शेख यांनी पत्रात म्हटलं आहे.

तर पालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे, “कर्मचाऱ्यांनी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची बदली केली जाते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमधले अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करीत आहेत. अनेकदा हे अधिकारी मनमानी पद्धतीने व काही विशिष्ट व्यक्तींचे हितसंबंध जपण्यासाठी काम करत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच विभागात आणि एकाच ठिकाणी अधिकारी, कर्मचारी यांची बदली करावी. ही प्रक्रिया येत्या १५ दिवसांमध्ये पूर्ण करावे. “