Pune : अन्यथा पूर परिस्थितीला मेट्रो जबाबदार, जलसंपदा विभागाचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महामेट्रोने नदीपत्रात टाकलेला भराव मुदत संपल्यानंतर देखील काढला नाही तर पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला मेट्रो जबाबदार असेल, असा इशारा जलसंपदा विभागाने मेट्रोला दिला आहे. तसेच या संदर्भात काही कायदेशीर पवलं उचलली गेली नाही तर त्यालाही मेट्रो जबाबदार असेल असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान नदीपात्रातील हा भराव तात्पुरताच असतो आणि पावसाळ्यापूर्वी तो काढला जातो, असा दावा मेट्रोकडून करण्यात आला आहे.

पुणे शहरामध्ये मेट्रोचे काम मागील काही वर्षापासून सुरु आहे. मेट्रोचे सध्या नदी पात्रातील काम सुरु आहे. यासाठी डेक्कन परिसर आणि मुळा मुठा संगमाजवळ राज्य गुन्हे गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयाजवळ महामेट्रोकडून भराव टाकण्यात येत आहे. पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते हे लक्षात घेऊन भराव काढणे अपेक्षित असते. परंतु मे महिना संपत आला तरी देखील मेट्रो नदी पात्रातील भराव काढलेला नाही. त्यामुळे हे भराव तातडीने काढून टाकावेत अशी सूचना जलसंपदा विभागाने पत्राद्वारे केली आहे.

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता हे भराव दोन मीटर पेक्षा जास्त उंचीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे नदीचा पूरवहन क्षेत्रात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात हरित लवादाकडे काही केस झाल्यास त्याची जबाबदारी महामेट्रोची राहील असे देखील पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान महामेट्रोचे संचालक व जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनावणे यांनी सांगितले की, नदीपात्रातील काम करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात भराव टाकावा लागतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी तो काढला जातो. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा टाकला जातो. मेट्रोचे काम संपल्यानंतर हा भराव कायमस्वरुपी काढून टाकला जाईल. आतापर्यंत 80 टक्के भराव काढला आहे. 15 जूनपुर्वी उर्वरीत भराव काढून टाकण्यात येईल.