शहरासोबत महामार्गांवरही हेल्मेटसक्ती अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी द्विवेदी यांचे आदेश

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – जिल्ह्यातील महामार्गावर आता दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटवापर आवश्यक तर चारचाकी वाहनांच्या वाहनचालकांनी सीटबेल्ट लावला नसेल तर त्यांच्याविरुद्धची कारवाई तीव्र केली जाणार आहे. महामार्गावरील वाढते अपघात टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता ही कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला असून तसे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.
  जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज (सोमवारी) रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.एम. मुरंबीकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण जगताप आदींसह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बेशिस्त वाहतूक करणाऱ्यांवर, विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांवर आणि वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. विना नंबर्स चालवण्यात येणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याची मोहिम गतीमान करण्यात आली आहे. याशिवाय, शहर आणि महामार्गावर दुचाकी चालवताना हेल्मेट अत्यावश्यक आणि चारचाकी चालविताना सीट बेल्ट आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यादृष्टीने पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्तपणे कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी केल्या.  हेल्मेट वापरणे अत्यावश्यक असून त्यामुळे जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाणही कमी होईल, नागरिकांनी यासाठी स्वताहून पुढाकार घेऊन हेल्मेट वापरण्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन श्री. द्विवेदी यांनी केले.

 महामार्गावर असणारे अपघातप्रवण क्षेत्रावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करावेत. सूचना देऊनही हयगय अथवा टाळाटाळ करणार्यांतवर कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.साखर कारखान्यांनी ऊसवाहतूकीसाठी करार केलेल्या ट्रक, ट्रॅक्टर, टायरची बैलगाडी आदी वाहनांवर रिफ्लेक्टेड टेप बसविण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करावी. अनेक कारखान्यांनी अशा रिफ्लेक्टेड टेप वाहनांवर बसविल्याचा लेखी अहवाल सादर केला आहे. मात्र, तपासणीवेळी तसे न आढळून आल्यास संबंधित वाहन आणि कारखान्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी परिवहन विभागाला दिले.