अजित पवारांची मोठी घोषणा ! पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवीन गावांचा समावेश करणार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेमध्ये (PMC) काही दिवसांपूर्वी नवीन गावांचा समावेश करण्यात आला. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेतही (PCMC) लगतच्य गावांचा समावेश करायचा आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. यामुळे महापालिकेच्या हद्दीत वाढ होणार आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालाकडून चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महपौर उषा ढोरे, मावळचे आमदार सुनील शेळके, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, अनेक गावांचे मिळून पिंपरी-चिंचवड शहर तयार झाले आहे. याठिकाणी विकासकामे करताना वाईटपणा स्वीकारावा लागला. पुणे-मुंबई महामार्गाचे रुंदीकरण करताना अनेक घरे हटवण्यात आली. तत्कालीन आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचेही घर काढले. विकासकामांसाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. महापालिकेतील गैरकारभाराची चर्चा होत असून आरोप करणाऱ्यांनी त्याबाबत पुरावे द्यावेत, त्यानंतर चौकशी केली जाईल असे अजित पवार म्हणाले.

कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न करा
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची संख्या कमी होत आहे. सर्वांनी खबरदारी घेऊन शहर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परदेशातून आलेल्या प्रवाशांवर नजर आहे. प्रवाशांनी देखील प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. स्वत: पुढे येऊन माहिती द्यावी. कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असताना आता बर्ड फ्लू चे संकट घोंघावत असल्याने सर्वांनी सतर्क रहावे असे आवाहन अजित पवार यांनी केली.

महिलांसाठी शक्ती कायदा
गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी आवश्यकतेनुसार काही कायद्यांमध्ये बदल करण्याची सरकारची तयार आहे. राज्यातील महिला, मुली सुरक्षित राहण्यासाठी शक्ती कायदा तयार करण्याचा विचार सुरु आहे. यासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.