महाराष्ट्र बजेट 2020 : अर्थसंकल्पातील ‘हे’ 10 महत्वाचे मुद्दे, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला. यावेळी सरकारने महिला सुरक्षा, कर्जमाफी, बेरोजगारासाठी सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. यावेळी अजित पवार यांनी वॉटर ग्रीड योजना, समृद्धी महामार्ग, ग्रामीण विकासावर सरकारचा भर असल्याचे घोषित केले.

शेतकऱ्यांना दिलासा –
शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी एकूण 22 हजार कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. 2 लाखांहून अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळेल. तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.

आरोग्य सेवा –
राज्यात 75 नवीन डायलेसिस केंद्र स्थापन करणार आहे. तसेच 102 क्रमांकाच्या जुन्या रुग्णवाहिका बदलून नव्या 500 रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी 87 कोटी रुपये उपलब्ध करुन देणार आहे. यापैकी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सेवेसाठी पाच हजार कोटी आणि वैद्यकीय शिक्षणाकरिता 2 हजार 500 कोटी बाह्य सहय्यित प्रकल्पांचा प्रस्ताव आहे.

कौशल्य विकास –
राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या दर्जात वाढ करुन त्यांचे आधुनिक प्रशिक्षण केंद्रात रुपांतर करण्यात येईल. खासगी उद्योजकांकडून 12 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे, शासनाकडून 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

आमदारांना अच्छे दिन –
आमदारांच्या स्थानिक विकास निधीत 1 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता आमदारांना मतदारसंघातील विकासासाठी 2 कोटींऐवजी 3 कोटींचा निधी मिळणार आहे.

पेट्रोल डीझेल महागणार –
पेट्रोल डीझेलच्या दरात प्रतिलीटर 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. अतिरिक्त कर आकारण्याची अजित पवार यांनी घोषणा केली आहे.

मुंबईत मराठी भवन बांधणार –
मुंबईत मराठी भाषेच्या प्रसारासाठी मराठी भवन बांधणार आहे. तसेच वडाळ्यात मुंबईत वस्तू आणि सेवा कर केंद्र उभारणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. यासाठी 148 कोटी रुपयांची तरतूद आहे.

आरोग्य विभागासाठी 5 हजार कोटींची तरतूद –
आरोग्य विभागासाठी 5 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत. तसेच डॉक्टरांची संख्या देखील वाढवण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. नव्या रुग्णवाहिकांसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद आहे. 20 नवी डायलिसिस सेंटर सुरु करणार आहेत. 996 प्रकारचे उपचार मोफत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रिडा संकुलासाठी 25 कोटींचा निधी –
जिल्हा क्रिडा संकुलासाठी 25 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. बालेवाडीत आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे. कबड्डी, कुस्ती स्पर्धांसाठी 75 लाखांचा निधी देण्यात येणार आहे. याशिवाय खोखो, व्हॉलिबॉल स्पर्धांना देखील 75 लाखांचा निधी देण्यात येईल.

बेरोजगारीच्या समस्येवर महाविकास आघाडीचा उतारा –
नवीन महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजनेची घोषणा करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार भरतीसाठी आस्थापनांना प्रोस्ताहन मिळून पाच वर्षात 10 लाख सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षित करण्यात येईल. त्यांनी रोजगाराची संधी देखील उपलब्ध करुन देण्यात येईल.